Saturday, May 16, 2020

सारपास

                                            स्वप्नांच्या पलीकडला प्रवास - सारपास

         
           मुंबई-दिल्ली -कुलू-भूँथर असा प्रवास करत चार मे च्या सकाळी आम्ही कसोल येथे सारपासच्या बेस कॅम्पला जाऊन पोहोचलो. हिरव्यागार वृक्षांनी वेढलेले छोटेसे मैदान, एका बाजूला खळखळ वाहणारी पार्वती नदी, दुसऱ्या बाजूला उंचावरून वळणा-वळणाने जाणारा डांबरी रस्ता व त्यापलीकडे देवदार वृक्षांचे घनदाट जंगल असे हे सुंदर ठिकाण होते. मागच्या बाजूला सूर्यकिरणांनी चमचमणारी हिमशिखरे साद घालीत होती. स्वागत कक्षाचा तंबू रंगीबेरंगी होता, तेथे नोंदणी झाली.


  गरमागरम चहा पिऊन मग जवळपास गोठायला आलेल्या त्या पाण्याने आंघोळ करण्याचे दु;साहस केल्यावर प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला. जेवणानंतर कसोल गावात चक्कर मारायला बाहेर पडलो तेव्हा छान ऊन पडले होते. पार्वती नदी व हिमशिखरांच्या कुशीत वसलेले कसोल हे एक छोटेसे खेडे आहे. परंतु इंटरनेट सारख्या अत्याधुनिक सुविधा ही इथे पोहोचलेल्या आहेत. तिथे पर्यटनाच्या निमित्ताने आलेले व इतरही बरेच इस्रायली लोक दिसतात. काही दुकानांच्या पाट्याही इस्रायली भाषेत दिसल्या. हॉटेलच्या छोट्या-मोठ्या इमारती,बैठी घरे, लोकरीच्या कपड्यांनी नटलेली दुकाने, सायबर कॕफेज, राॕयल एनफिल्ड वरून फिरणारे देशी-विदेशी पर्यटक, मधूनच जाणारे शेळ्या-मेंढ्यांचे मोठाले कळप आणि प्रत्येक कुंपणावरून आपल्याला खुणावणारे रंगीबिरंगी टपोरे गुलाब असा हा सर्व माहोल होता.

        अतिशय उंचीवरील विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी तीन दिवस बेस कॅम्पला राहावे लागते. येथे रात्री कॅम्पफायर मध्ये रोज एक-एक बॅच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते. मॉर्निंग एक्झरसाइज, अक्लायमेटायझेशन वाॕक, रॉक क्लायंबिंग, रॕपलिंग, परस्पर परिचय, पुढील तयारी इत्यादी गोष्टी या तीन दिवसात होतात. त्याशिवाय आम्हाला मनसोक्त हिंडायला मिळाले नदीकिनारी झाडीत व देवदार वृक्षांच्या जंगलात विविध आकारांचे, विविध रंगी पक्षी दिसले. रुबीथ्रोट, पॅराडाईज फ्लायकॅचर  ज्युवेनाइल, मॕगपी, रावेनस् इत्यादींची ओळखही पटली. त्याशिवाय अफूची झुडुपेही काही ठिकाणी दृष्टीस पडली.


कसोल गावात पुलावरुन पलीकडे गेले की गरम पाण्याचे झरे आहेत. मणिकर्ण हे पौराणिक महात्म्य असलेले स्थानही  येथून ४-५ किमी अंतरावर आहे. शंकर-पार्वती विहार करीत असताना पार्वतीच्या कर्णकुंडलातील मोती येथे पडला. तो शोधण्यासाठी वासुकी नागाला पाचारण करण्यात आले. मग वासुकी नागानी जी फुंकर मारली त्यातून प्रथम मणि बाहेर पडला व मग गरम पाण्याचे झरे वाहू लागले, अशी दंतकथा आहे; म्हणून नाव मणिकर्ण. एवढ्यात थंड हवेत येथील कुंडांमध्ये स्नान करणे म्हणजे निव्वळ चैन असते.

        आठ मे ला सकाळी सर्वांचा निरोप घेऊन आम्ही ग्रहण कॅम्पकडे जाण्यासाठी निघालो. ग्रहणची कॅम्प साईट चहूकडून डोंगरांनी वेढलेली होती. जवळच एक ओढा होता. त्याचेच पाणी नळीनी कँपपर्यंत आणलेले होते. ग्रहण कँपच्या जवळ गाव होते. ग्रहणमधील लाकडी घरे विशिष्ट पद्धतीची आहेत. इथे घरोघरी विणकामाचे हातमाग होते. चाँद युवा  नावाचे एक एनजीओ इथे काम करते. त्यांच्याकडून येथील लोकजीवन इत्यादीची माहिती मिळाली.

         वरच्या सर्व कॅम्पसमध्ये रोज संध्याकाळी सूप






 देण्यात येते. थंडगार हवेत निसर्गाच्या सान्निध्यात त्या
सूपची मजा ही वेगळीच असते. क्षणाक्षणाला निसर्ग त्याची रूपे पालटत असतो आणि तो एक एक क्षण जगताना, जपताना, साठवताना आपण आपल्याही नकळत त्याच्याशी एकरूप होऊन जातो.
        ग्रहण ते पद्री ही वाट निबिड अरण्यातून जाणारी होती. पाऊस पडून गेल्यामुळे आधीच उताराची असणारी वाट अधिक निसरडी झाली होती. वाटेत लाल-गुलाबी-केशरी रंगाचे मखमली फुलांचे गुच्छ लागलेली बरीच झुडुपे होती, त्यांचा मंद सुगंध, रानफुले आणि मधूनच दर्शन देणारी हिमशिखरे यामधून होणाऱ्या प्रवास म्हणजे 'राह बनी खुद मंझिल' असाच होता.

        झुळझुळ वाहणाऱ्या  झऱ्याच्या  एका बाजूला तंबू, त्यामागे अगदी जवळ दिसणारी हिमशिखरे तर दुसऱ्या बाजूला गर्द झाडी अशी होती पद्री कँपसाइट. इथल्या जंगलामध्ये अस्वले व वन्यप्राणी खूप आहेत. त्यामुळे एकेकट्याने लांब फिरायला जाणे धोक्याचे असते. इथे लेडी बग नावाचा एक चमकदार गडद लाल रंगावर काळ्या रंगाची नक्षी असलेला किडा दिसला. इथे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घ्यायला भरपूर अवकाश मिळाला. अशा शांत निवांत ठिकाणी घालवलेले, चित्तवृत्ती एकाग्र झाल्यावर जगाचा विसर पाडणारे काही क्षण म्हणजे आपल्या आयुष्यभराची पुंजी असते.

             पदरी ते रातापाणी हा सर्वात लांब ट्रेक होता. घनदाट जंगलातून तीव्र उतारावरून हजार फूट उतरल्यानंतर तीन हजार फूट चढाई होती. दुपारी दोनच्या जवळपास आम्ही लंच पॉइंटला पोहोचलो. त्या जागेवरून सभोवतालचा विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता. डावीकडे खोल दरी होती. समोर जवळ येत जाणारी हिमशिखरे व मागे घनदाट जंगल होते.पोहोचलो तेव्हा छान ऊन पडले होते. पण क्षणात आकाशाचे रंग पालटू लागले. पुढे बर्फातून चालायलाही गंमत येत होती. शेवटी एक छोटासा रॉक पॅच चढढून गेल्यावर रातापाणी कॅम्पच्या बॅनर जवळ आम्ही पोहोचलो. ती जागाही कुणीही चिकटवून बसावे अशीच होती. त्या टोकावर खाली खोल दरी होती वर पावसानंतर स्वच्छ झालेले निळे आकाश होते आणि दूरवर ग्रहण व पद्री कँप दिसत होते. करड्या रंगाचा उंच उडणारा ग्रिफन हा पक्षी दिसला.


             रातापाणी कॅम्पही भरगच्च झाडीने वेढलेला होता. पाण्याचा नळाच्या बाजूलाच शेकोटी होती. त्यामुळे त्या थंडगार पाण्यात हात घातला की लगेच शेक घ्यायचा. त्या शेकोटीजवळ कितीतरी वेळ गप्पांना रंगत आली होती. ग्रहणमधील कॅन्टीन वाले दोघेजण त्यात सामील झाले.त्यांची बोली भाषा कुलवी;  त्यांचे मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व मेंढ्या पाळणे.  सूरदासांच्या दोह्यांनी या गप्पांची सांगता झाली.


         नगारूला जाताना पिवळी -जांभळी अशी छोटी-छोटी रानफुले लक्ष वेधून घेत होती. बर्फाचे टप्पे पार करून जाताना आकाशात उंच झेपावणारे गरुड व घारी दृष्टी खिळवून ठेवत होते. त्या उंचीवर पोहोचल्यावर तर 'आज मै उपर आसमाँ नीचे'असे सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. नगारूचे तंबू बर्फात लागलेले होते. दृष्टि जाईल तिथे सगळीकडे हिमाच्छादित भूमी दिसत होती आणि आमच्या स्वागतासाठी आकाशातूनही हिमवर्षाव सुरू झाला. हिमवर्षावाचा आनंद लुटत असतानाच आकाश स्वच्छ होऊन लख्ख ऊन पडले. आता आकाशात सूर्य किरणांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्या आकाशाच्या कॅनव्हासवर पांढऱ्या शुभ्र  ढगांचे पुंजके व त्याखाली सरळ दोन रेषा ओढल्या सारखा पिवळ्या रंगाचा पट्टा, त्यामध्ये तांबूस लाल सूर्यबिंब आणि हे लोभसवाणे चित्र पाहायला हळूच डोकावणारा चांदोबा दिसत होता. मंत्रमुग्ध होऊन हा खेळ पाहत असताना कॅमेरा आणण्याचे भान येईपर्यंत चांदोबा ढगांशी लपाछपी खेळताना लपून बसला होता आणि सूर्य त्याची ०६:३६ ची लोकल पकडून निघून गेला होता. त्यावेळी मनात आले की आपण कधी अशा स्वर्गलोकी येऊ अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


             जेवण झाल्यावर आम्ही झोपण्याच्या तयारीत होतो. सर्वत्र दाट काळोख व्यापून राहिला होता. इतक्यात विद्युल्लतांचा लखलखाट सुरू झाला. घोंगावणारा वारा आणि वादळ यांचे तांडव सुरू झाले. डोळे गच्च मिटून आम्ही चौघी पडून होतो. आणि आपल्या  डोक्यावरचा हा तंबू आता उडून जाणार याची आम्हाला जवळ जवळ खात्री वाटत होती. अशातच माझा अर्धवट डोळा लागला असेल. मला जाग आली तेव्हा इतर तिघी जणी उठून तंबूच्या दोऱ्या ओढून बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे अजून तंबू जागेवर होता तर!


          गरम चहा-नाश्ता घेऊन पहाटे चार वाजता टॉर्चच्या प्रकाशात एका लांबच-लांब रांगेतून आम्ही त्या बर्फातून चालू लागलो. तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. सारी सृष्टी पांढरी शुभ्र बर्फाची चादर पांघरुन गाढ झोपेत होती. आकाश निरभ्र होते. थोड्याच वेळात रविराजांचे आगमन झाले व चारी दिशा उजळल्या. सूर्योदयाच्या त्या अपूर्व उत्सवात तना-मनाने सहभागी होऊन आम्ही साधारण आठ वाजता सारपासला पोहोचलो. सारपासची उंची साधारण चौदा हजार फूट आहे. आत्तापर्यंत शांततेने मार्गक्रमण करणाऱ्या सर्वांच्या उत्साहाला एकदम उधाण आले. कोणी उड्या मारून, कोणी हर्षभराने जल्लोष करून, तर कोणी तिरंगा फडकवून हा आनंद साजरा केला. याचसाठी केला होता अट्टाहास.....



             
आता उतार सुरू झाला. बर्फामध्ये घसरगुंडी करुन जायला विलक्षण मजा येते. स्लायडिंग करताना बरोबर पोझिशन घेऊन जाता आलं तर ठीक आणि जर पोझिशन चुकली, पाय घसरला तर गडगडत जावे लागते; असे कौशल्यही काही जणांनी दाखवले. बर्फामध्ये चालण्याची, पडण्याची, खेळण्याची, घसरण्याची पुरेपूर मौज इथे अनुभवता आली.


            बिस्केरीला सूर्यास्ताच्या वेळेस सूप घेताना दूर पर्वतरांगांमध्ये कोसळणारा जलप्रपात दिसत होता. आणि अचानक त्यावर सूर्यकिरण पडून एक लांबलचक लोभसवाणे इंद्रधनुष्य दिसू लागले. बाह्यचक्षू आणि अंतःचक्षू  दोन्ही मंत्रमुग्ध होऊन गेले. बिस्केरी-पुलगा-बरसैनी हा ट्रेक तीव्र उताराचा आहे. वाटेत एका ठिकाणी हिरवंगार मैदान लागलं. त्यापलीकडे शिस्तीत उभे असलेले देवदार वृक्ष दिसत होते. या वाटेनी जाताना तरु-वेलींना, गिरीशिखरांना,धबधब्यांना आणि नदी-नाल्यांना अच्छा-टाटा म्हणताना मन जडावले होते.

              महाराष्ट्र , गुजराथ, दिल्ली, कर्नाटक आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आम्ही सर्व जण इतके दिवस एकत्र प्रवास करत होतो. प्रत्येकाचे वय वेगवेगळे; विक्रम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता तर नागपूरच्या नाना आगाशे साठ वर्षांचे होते. प्रत्येकाचे व्यवसायही वेगवेगळे; कोणी सरकारी अधिकारी, कोणी संशोधन क्षेत्रात, कोणी हॉस्पिटलमध्ये, कोणी बँकिंग/ फायनान्स मध्ये, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, कोणी पोलीस तर कोणी दागिन्यांचे व्यापारी. असे सर्व भिन्न प्रकृतीचे भिन्न भाषिक लोक आपली ओळख विसरून एकमेकांमध्ये कसे मिसळून गेलो ते कळलेही नाही. एकमेकांची थट्टा मस्करी करत आणि एकमेकांची काळजी घेत अकरा दिवस बघता-बघता भुरकन उडून गेले.


   बेस कँपला शेवटच्या रात्री कँप फायरमध्येआम्हाला सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. तेथे पुढे जाण्यासाठी तयार असलेल्या तीन बॅचेस होत्या. त्या सर्वांना वर परिस्थिती कशी आहे याबद्दल कमालीची उत्सुकता आणि बराचसा ताण वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा अनुभव ऐकून व प्रफुल्लित चेहरे बघून आमचं टेन्शन गेलं, अशी पावती जेव्हा आम्हाला काही जणांकडून मिळाली तेव्हा खरंच समाधान वाटले. प्रसन्न  मनाने सर्वांचा निरोप घेऊन आम्ही कसोल कँप सोडला तो फिरून कधीतरी पुन्हा इथे येण्याचा निश्चय करुनच.....






































Sunday, May 3, 2020

सवाश्णी - वाघजाई - ठाणाळे ट्रेक, १५,१६ जून २०१७

सवाष्णी - तेलबैला - वाघजाई - ठाणाळे ट्रेक (१५,१६ जून २०१८)

             
               शनिवारी सकाळी पाऊस रंगात आला होता. मी आणि मधु ठाणे स्टेशनला भेटून जुईनगरसाठी गाडीत बसलो. "अभिजीत,आम्ही लोकल पकडली आहे तू निघालास का?" कुर्ल्याहून दीपक आणि अभिजीत एकत्र  येणार होते. आम्ही जुईनगरला आधी स्टेशनमध्येच थांबून राहिलो. एक चहा घेतला, मग पुलावरून रस्त्याकडे निघालो. तितक्यातच गाडीही आली आणि सुसाट निघाली. ते तिघे एकमेकांना ओळखतच होते. माझी जलतरणपटू आणि इतिहास विषय मुलांना गोष्टी सांगून रंगवून शिकविणाऱ्या  दीपक सरांशी ओळख झाली. मी घरातून देहाने जरी बाहेर पडले असले तरी चित्त अजून घरच्याच विचारात होते. सरांकडून हॉटस्पॉट घेऊन वाण्याची यादी पाठवली तेंव्हा कुठे मन घरातून बाहेर पडले. कल्पना आणि किशोरीची  फार आठवण येत होती. या दोन्ही माझ्या ट्रेकच्या  सख्या. वातावरण मस्त होते. लाल माती, हिरवीगार शेते, नुकतेच पडू लागलेले छोटे - छोटे धबधबे, सारे दृश्य विलोभनीय होते. जांभुळपाड्याला पोहे, मिसळ, उपमा, शिरा, बटाटेवडा आणि मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक वर फक्कड चहा, खाण्याची चंगळ केली.
            
            आता धोंडसेच्या दिशेनी वेगानी निघालो. खोपोली - पाली रस्ता मस्त होता. हा रस्ता मला नेहमीच आवडतो. नदी, वळणे, शेते, देऊळ आठवणींमध्ये घेऊन जातात. धोंडसेवरून डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या बहिरामपाड्याला पोहोचलो. सोबतीला वाटेनी सुधागड आणि सरसगड होते. बहिरामपड्यामध्ये मुलांना विचारले, चलता का वरती तेलबैलाला सवाष्णीनी, वर मुक्कम करुन उद्या रात्री वाघजाईनी उतरू या. मग गजानन बुवा आपली काठी आणि पाण्याची बाटली घेऊन, घरी जाऊन कारभारणीला उद्या परत येईन असे सांगून आम्हाला वाट दाखवायला निघाले. हा चढ तसा फार तीव्र नाही, उंचीही बेताची; हसत - खेळत - मजेत जाऊ. जेवणाची  घाई तर अजिबात नव्हती. तेलबैलाचे प्रथम दर्शन तर रस्त्यातूनच झाले होते. आपल्याला साधारणपणे कुठे जायचय याचा अंदाज यावा म्हणून 'U' आकाराच्या खिंडीच्या दिशेनी जायचे आहे असे गजानन बुवांनी सांगितले होते.  आमच्या स्वाऱ्या  उत्साहात निघाल्या. फळझाडे फळांनी लगडली होती. बाजूला घनगड उभा होता. मागच्या वेळी घनगडाला गेलो होतो तेंव्हा मिळालेल्या कैऱ्या आणि घनगडाच्या गुहेकडून दिसणारे भूदृश्य दोन्ही खास ... सरसगडाला जाताना उन्हामुळे चक्कर आली होती आणि सुधागडाची वाट दाट जंगलातून जाणारी, शीतल छाया देणारी आणि छोट्या - छोट्या शिड्यांनी चढवणारी; प्रत्येक वाटेचा पोत वेगळा. "मागच्या वेळी घाट - वाट कोणती केली होतीस?" "तुझ्या बरोबरच अस्वलखिंडीची" मग जादूचे गवत, दवानी भिजलेली पाती काही स्मरणचित्रे तरळून गेली. पुन्हा एकदा कल्पना हवी होती, कल्पनाला तिकडे उचक्या लागल्या असतील. दाट जंगल आणि हिरव्या पालवीची कोवळीक मन प्रसन्न करत होती. पाऊसवारा वाहत होता, पण पाऊस लपाछपी खेळत होता. पाऊस दिसला रे दिसला की त्याचा भोकंजा करण्याआधीच तो ढगात लपत होता.                                 

              वाटेत कुठे प्यायला पाणी नाही, पण बरोबर भरपूर पाणी होते. मग सुधागडाच्या समोर मोकळी जागा बघून आम्ही आमचे डबे काढले. आता सवाष्णी घाटाचे मोठे टप्पे पार केले होते आणि तेलबैला अगदी दृष्टिपथात आला होता. आजच तिकडेही जाऊ या, आमचा विचार झाला होता. तांदळाची भाकरी, आंबा मावा, खिचडी, लसूण चटणी, चेरी, केळी अशी पदार्थांची रेलचेल होती. त्या तिघांनी उकडलेली अंडीही चटणीबरोबर खाल्ली. दुपारचे अडीच-तीन वाजले होते आणि दूर बासरी साद घालत होती. रानात गुरे चरत होती. जवळच मुले खेळत होती. आणि आमचे ट्रेक आणि लंच पार्टनर जे आज बरोबर नव्हते , त्यांची उणीव जाणवत होती. जवळ जाऊ तसे तेलबैला आपले वेगळे रूप दाखवत होते. हे डोंगर इतक्या जवळून प्रथमच बघत होते.

डावीकडे नवरा-नवरी आणि वराडे होती.

बासरीवाल्याला भेटायचे राहून गेले.तेलबैला गाव आले. जेवणाची आणि राहण्याची सोय कुठे होईल का चौकशी करू लागलो. कारण इथे  फोन न लागल्यामुळे  कोणाशीच आधी संपर्क झाला नव्हता.  सगळी घरे मेंन्यांची आहेत. गजाननबुवांचे सोयरे भेटले. मास्तरांचे घर मोठे आहे. राहण्याची सगळी व्यवस्था होईल. घर छानच होते.  पण पिण्याचे पाणी हापशाचे;  पावसाळा असल्यामुळे पन्हाळी वरून पडणारे पाणी पिंपात साठवून ठेवल्याने  वापरायला भरपूर पाणी होते. सामान घरात ठेवून लगेच तेलबैला कडे निघालो. दुसऱ्या रस्त्यानी तेलबैलाच्या  पायथ्यापर्यंत गाडी


जाते. पिवळ्या रंगाची एक मिनी बस उभी होती. त्यामधून सकाळी घनगडाला जाऊन आलेली मंडळी भेटली. ते पुण्याकडे परत निघणार होते. त्यांच्याशी नमस्कार वगैरे करून  पुढे निघालो. झेंड्याची काठी लागली. तिथून खाली बघताना नजर ठरत नव्हती. फोटो झाला आणि मंदिराकडे निघालो. रोवलेला त्रिशूळ, शेंदूर फासलेले देव आणि एक पाण्याचे टाके असावे आतमध्ये. पण मंदिराला कुलूप होते. हे मंदिर दोन डोंगरांच्या सांध्यात बांधले आहे. इथे थोडी चिक्की खाऊन, भाकरी मात्र माकडांना दिली.  निवांत बसलो होतो. समोर तेलबैला प्रस्तरारोहणासाठी लावलेले बोल्ट दिसत होते. हे अवघड श्रेणीचे प्रस्तरारोहण नजरेनी करून घेतले. आम्ही दोन कड्यांच्या खिंडीत बसलो होतो. समोर खालच्या बाजूला मंदिर होते. आणि वर उंच कडे. माणसे घेऊन घाईघाईनी निघून जात होती. इथून तेलबैला गावात जायला जास्तीत जास्त अर्धा तास लागणार होता. आम्ही आरामात खाली उतरलो. भुरुभुरू पाऊस मधेच येत होता. घरी पोहोचून गरमागरम चहा, भेळ आणि गप्पागोष्टी अशी मस्त भट्टी जमून आली. इथे शाळा फक्त चौथीपर्यंत आहे. शिकायला आजींची एक नात आश्रमशाळेत राहत होती  तर दुसरीला शिकण्यासाठी दररोज दोन तीन तास एसटीने प्रवास




करावा लागतो. दोघी दहावीला.आई वडील पुण्याला. इथे आजी-आजोबांची शेतजमीन आहे. आजी फार प्रेमळ आणि अगत्यशील. वाढणं, जेवायला घालणं, सग्ळं मनापासून. अजून उजेड  होता. कारण वर्षातला सगळ्यात मोठा दिवस, २१ जून जवळ आला होता. फिरायला बाहेर पडलो. बाजूला डोंगर दिसत होते.

त्यामुळे घराच्या पडवीत चैन पडत नव्हते. मग शेतांमधून रस्ता काढत, डोंगराच्या शक्य तितक्या जवळ जरा बरी जागा बघून स्वस्थ बसलो. अभिजीतनी तर मस्तपैकी एक डुलकी काढली. दीपकनी हिंदी सिने गीते गायली. असे हिरव्यागार सृष्टीमध्ये डोंगरांच्या कुशीत निवांत मिळणारे क्षण तर ओढ लावतात, पुन्हा -पुन्हा ट्रेकला येण्याची. सूर्यास्ताचे काही चिन्ह नव्हते. पण पावसाचे ढग मात्र जमू लागले. म्हणून आम्ही परत फिरू लागलो. जाऊन शांत पडले. डोळे मिटत होते पण झोप लागली नाही. गप्पा मात्र मनसोक्त झाल्या. दीपक आणि अभिजीत गावात पुन्हा फेरफटका मारायला गेले. ते आल्यावर भरपेट जेवण आणि जेवणानंतर शतपावली.
         पहाटे साडेपाचला झोप उघडली. मुखमार्जन करुन चहाच्या आधीच  लाडू, सुकामेवा खाल्ला. मेन्यांबरोबर फोटो काढून, गजानन बुवांना सोबत घेऊन वाघजाईच्या रस्त्याला लागलो. उतार सुरु

होण्या आधी  सारा परिसर नजरेच्या कवेत घेणारी आणि सुधागडाची सोबत असणारी मस्त मोकळी जागा मिळाली. पुन्हा
एकदा आसमंतात पावा घुमत होता. आज मात्र येताना त्या बासरी वाल्याची आणि झाडांचा घोडा करणाऱ्या त्या मुलांची थोडी वाट वाकडी करून भेट घेतली. पराठे, मॅंगो


जाम, केक वगैरे भरपेट नाश्ता करुन  मग लगबगीने निघालो. आता परत निघाल्यावर बाजूला  दिसणारी ठाणाळे लेणी सोबत करत होती. देवीचे ठाणे आले. मला वाटतं देवी रक्षण करते घाटाचे म्हणून देवीचे  ठाणे. भगवा ध्वज  फडकत होता. तिथून पुढे निघाल्यावर दूरवर लेणी दिसली. आम्हाला खाली उतरून पुन्हा लेण्यांकडे जाण्याची वाट शोधत जायचे होते. म्हणून मग लेण्यांच्या उंचीवर आल्यानंतरही वाट शोधण्याचा प्रयत्न केला नाही. कारण वाघजाई घाट करणे हा आमच्या  ट्रेकचा प्राथमिक भाग होता. मग बरेच उतरून गेलो. ठाणाळे गावाकडे जाणारी वाट दिसली. पण वाघजाई घाटातून ठाणाळे लेण्यांकडे जाणारी वाट शोधायची होती. गजानन बुवा होते, तेही शोध घेऊ लागले. याच्या आधी वाट दाखवणारे बाण दिसत होते, पुन्हा ते बाण दिसतील का, याचा शोध घेऊ लागलो. दिशेचा अंदाज घेऊन साधारण मळलेल्या पायवाटेला लागलो आणि अचानक लेणी समोर आली. पावसाने मस्त जोर धरला होता.  सुरुवातीची काही लेणी प्राथमिक अवस्थेतील आहेत. पुढे एक प्रशस्त लेणे लागले. या लेण्यांमध्ये सुंदर कोरीवकाम आणि कातळात कोरून काढलेल्या सुबक पायऱ्या होत्या. कमळ कोरलेले होते. तसेच कमानींच्या सोंडेत कमळ घेतलेले दोन हत्ती, सर्प, वाघ वगैरे सुंदर कोरीव काम होते. यापुढील एका लेण्यात बरेच स्तूप होते. ही लेणी बघायला आमच्याशिवाय अजूनही काही मंडळी आली होती. पण पटापट बघून, सेल्फी काढून पुढे गेली. वाट वाकडी करुन ठाणाळे लेण्यांकडे येण्याचे सार्थक झाले होते. पावसाने भिजवून चिंब केले होते. बळीराम पाड्यातला राजाभाऊंच्या अस्थायी निवासस्थानी म्हणजे समाज मंदिर हॉलला आलो. इथे कोणीही येऊन राहू शकते. ट्रेकर किंवा यात्रेकरू एखादा मुक्काम करतात. मावशीनी गरमागरम गोड चहा दिला आणि भरपूर पापड तळले. पुरणपोळ्या, ठेपले, काकड्या जेवण सोबत होतेच. कपडे बदलून, जेवून परतीच्या प्रवासाला लागलो आणि पुन्हा जुईनगरला उत्तरलो. चिंब पावसाळी वातावरण भजी आणि गरम चहाची मागणी करत होते ते; ती घरी जाऊन पूर्ण केली.





 
       


































Sunday, April 12, 2020

रतनगड ते हरिश्चंद्रगड

                                 रतनगड ते हरिश्चंद्रगड (१/११/२०१९ ते २/११/२०१९) 

                   ठाण्याच्या  फलाट क्र.५ वर मी आणि केतकी ११.३४ ची कसारा गाडी पकडायला उभ्या होतो. मन मात्र सामरदला जाऊन पोहोचले होते. सामरदहून पहाटे उठून सांधण दऱ्याला जाताना बघितलेल्या डोंगररांगा खुणावत होत्या. रतगडावरुन त्रिंबक दरवाज्याकडून पायऱ्या उतरुन गेल्यावर  दिसणारी अपार खोली आठवत होती. तुटलेल्या पायऱ्या  बघून ही वाट कशी असेल अशी दाटून आलेली भीतीमय उत्सुकताही अजून चेपली नव्हती आणि श्रीकांतबरोबर पहिल्यांदा रतनगडाला जाताना मोकळवनात कात्राबाईच्या दिशेनी बाण दाखवणारी 
हरिश्चंद्रगडाकडे  ही पाटी बघत या वाटेनी कधीतरी जाऊ या, अशी मनाशी बांधलेली खूणगाठ स्मरत होती. सोनकीनी फुललेले सोनेरी डोंगर बघायला मिळतील का खरंच? मागच्या डिसेंबरमध्ये आलो होतो तेंव्हा थंडीची आणि कॅम्पिंगची गंमत होती.
              पाऊस आता गेला असे वाटत असतानाच शुक्रवारी रात्री  स्टेशनला जाताना भुरुभुरु पाऊस पडत होता. ठाण्याला गाडीत बरीच गर्दी होती. खरं तर गाडीत मस्त झोप काढू या असे ठरवले होते. पण केतकी पहिल्यांदच आमच्याबरोबर  ट्रेकला येत होती त्यामुळे आमच्या गप्पांमध्ये एक - एक स्टेशन कधी मागे पडले ते कळलेच नाही. गाडी भराभर मोकळी  होत गेली. आणि आमच्या डब्यात आसनगांवनंतर  
आम्ही  दोघी आणि दोन पोलीस फक्त उरलो. २२ वर्षांची केतकी सीए होऊन आता युपीएस्सीची तयारी करत होती. तिची ट्रेकिंगची आवड मात्र खास आहे, म्हणूनच  अभ्यासातून  मुद्दाम  वेळ काढून, सॕक भरुन ट्रेकला निघाली होती. कसाऱ्याला मधु आणि शेखर भेटले. सांधणला जाताना कसारा स्टेशनमधून बाहेर पडून, यार्डात उभ्या असलेल्या  ३-४  गाड्या  उड्या मारत ओलांडून रस्त्यावर जाऊन जीप पकडली होती.आज मात्र खाली उतरुन जिन्यानी गेलो. आम्हाला घ्यायला इंडिगो गाडी आली होती. ती बघून चक्र हातात घ्यावेसे वाटत होते. पण मुकाटयाने मागच्या सीटवर जाऊन बसले. कसारा घाटातल्या शेवटच्या बाबा दा ढाब्यावर गाडी थांबली. गाडी चालवायची नसल्यामुळे झोप काढायची होती. म्हणून आल्याचा कडक चहा पिण्याचा मोह टाळला. गाडीत इंधन आणि चौघांचा सेल्फी झाल्यावर सुसाट निघालेली गाडी इगतपुरीच्या टोलनाक्यानंतरच्या भावली धरणाच्या रस्त्याला उजवीकडे वळली. बाबा दा ढाबा, हा रस्ता, हा रात्रीचा प्रवास एका वेगळ्या जगात माझ्या जिवाभावाच्या संवंगड्यांसोबत घेऊन जातो डोळे मिटून शांत बसावे तर कधी मध्येच काही बोलावे. रस्ता खूपच चांगला होता. गडद काळोख, धुके, पाऊस.... रस्त्यावर अगदी अंधुक दिसत होते.
         पहाटे पाचच्या सुमारास सामरद आले. मारुतीच्या मंदिरात पथा-‌‌‌‌‌या पसरुन दोन तास आराम केला. साडेसातला लख्ख उजाडले होते. डोंगररांगा  ढगांशी पाठशिवणीचा खेळ ख़ेळत होत्या. हातपंपावरुन पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या. एका घरात जाग दिसत होती. त्यांनी आम्हाला फक्कड चहाही करुन दिला. वाटेत एका दगडावर बसून न्याहरी केली आणि साडेआठला स्वाऱ्या  रतनगडाकडे रवाना झाल्या .
         नोव्हेंबरच्या सुरुवातीलाही थंडीमुळे नाही तर ढगाळ हवेमुळे वातावरणात थंडावा होता. आज लांबचा पल्ला गाठायचा होता. त्यामुळे सुरुवातीपासूनच वेगाने वाटचाल करत एक-एक टप्पा पार केला. हळुहळू  आकाश स्वच्छ होऊन अलंग-कुलंग-मदन , अजापर्वत, औंढा, पट्टा, पाबरगड, कळसूबाई सारे सचैल स्नान झाल्याने  प्रसन्न दिसू लागले. डोंगरांमध्ये  कुठे तरी जलधाराही अजून कोसळत होत्या. रतनगडाचा खुटा आमची सोबत करत होता. वाटेत मागे वळून बघितले तर आयतासारख्या आकाराचा बाणचा सुळका खोलातून मान                                                                     

उंचावून उभा होता. हल्लीच झालेल्या पावसामुळे वाटेत बरेच दगड घरंगळून आले होते. अवघड ठिकाणी लावलेल्या शिड्याही धरणीवर शांत पहुडल्या होत्या. चकली, लाडू, मोहनथाळ, सुकमेवा, खजूर असा खाऊ खात साधारण तीन तासात किल्ल्याच्या नेढ्याला पोहोचलो. नेढ्याकडून माहुली, नवरा-नवरी- वराडे हेही स्वच्छ दिसत होते. खुट्याला जवळून न्याहळत उंच वाढलेल्या गवतातून वाट काढत प्रवरेच्या उगमाच्या कुंडाकडे गेलो. कुंडातील थंड आणि गोड पाणी पिऊन तृप्त झालो. बुरुजावरुन टेहळणी करुन गणेशाचे दर्शन
घेऊन मुख्य दरवाजातून प्रवेश करुन रत्नाई देवीला हात जोडले. गुहेकडे नातूझडे मामा भेटले. किशोरीची आठवण काढत लिंबू सरबताचा मोह टाळला. आता किल्ला उतरु लागलो. या वाटेकडच्या शिड्या मात्र सुस्थितीत आहेत. त्या मोकळवनात पोहचायला अंमळ उशीरच झाला.  भूकही लागली  होती. एका चौथऱ्यावर शिवराममामांनी छोटेसे दुकान थाटले आहे. तिथे बसून कोबी पराठे. तिखटमिठाच्या पोळ्या, मेथी ठेपले, जॕम, काकडी असा सगळ्या


पदार्थांवर ताव मारला. कात्राबाईची खिंड पार करुन कुमशेत आणि जमलं तर पलीकडे पाचनई गाठण्याचा आमचा मानस होता. शिवराममामा खिंडीपर्यंत सोडायला यायला तयार झाले. यांना  शंभू महादेवानी स्वप्नात येऊन दृष्टान्त दिला म्हणून ते चपला घालत नाहीत. हातात एक काठी घेऊन मामा सज्ज झाले. डोंगर रांगेला घट्ट धरुन सरळ जायचे इतके सोपे होते. पण वाटेत सगळीकडे कारव्ही उंच वाढली होती.सुरुवातीलाच दोन वाटा लागतात. डावीकडची  रतनवाडीकडे जाणारी वाट स्पष्ट दिसत होती. पण उजवीकडे कात्राबाईकडे चढणारी पायवाट मात्र कारवीनी पूर्ण झाकलेली होती.  इथे वाट चुकण्याची दाट शक्यता होती. सव्वा दोन वाजता चालायला सुरुवात केली तेंव्हा डोळ्यावर प्रचंड झापड येत होती. पण मामांच्या मागे पटापट पावले टाकत झपाझप चाललो होतो. कात्राबाईच्या  खिंडीत पोहोचलो. हात जोडून देवीचे दर्शन घेतले. मामांना निरोप देऊन कुमशेतकडे चालू लागलो. वाटेत डोंगरातून येणारे थंडगार पाण्याचे झरे लागले. हे पाणी पिऊन व तोंडावर मारुन तजेला आला.


मग दगडावर बसून थोडा फराळ केला आणि अंधार पडायच्या आत पुढे निघालो. संध्याकाळचे पावणे सात वाजले होते. कुमशेतपर्यंत जायला चांगली मळलेली पायवाट होती, हे मधूला माहीत होते. त्यामुळे आम्ही बिनधास्त होतो.अंधार झाल्यावर विजेऱ्या सुरु केल्या आणि एकमेकांच्या वेगाशी जुळवून घेत एकत्रच जावे असा ठराव झाला. वाटेवरच्या शेतातली माणसे काम संपवून खोपटाकडे परतत होती. अशाच एकुटवाण्या खोपटातले दादा आता अंधारात एवढे पुढे जाऊ नका, आजची  इथेच रहा असा प्रेमळ आग्रह करत होते. नेटवर्क नसल्यामुळे  पाचनईतल्या  भास्करचा फोन लागत नव्हता. त्यामुळे उद्या पाचनईवरुन परतीची सोय कशी होईल ते कळत नव्हते. वाडी संपून कुमशेत आले. साडेसात वाजले होते तरी अजून पुढे जाऊन नऊपर्यंत पेठाची वाडी गाठता येईल असे वाटत होते. कारण त्यामुळे उद्याचा वेळ वाचणार होता. पेठाच्या वाडीपुढे डांबरी रस्ता नसल्यामुळे  वाहनाची सोय नव्हती. पुढची वाटही अवघड होती.  नदी, ओढा पार करायचा होता. पुढे मजल मारायचा प्रयत्न करत, वाट शोधत काहीशा द्विधा मनःस्थितीत आठ-साडेआठ पर्यंत चालणे सुरु ठेवले. पण असे लक्षात आले कीअंधारात वाट शोधत चाचपडण्यापेक्षा आज कुमशेतलाच राहावे. कुमशेतमध्येही १-२ जणांनी तसेच सुचविले होते.  मग कुमशेतला एका घरी मुक्काम केला. त्यांनी बैठकीच्या खोलीत आम्हाला चटया घालून दिल्या आणि वाफाळता चहा दिला. त्या बिनदुधाच्या चहानीही थोडी तरतरी आली. मग थोडे स्ट्रेचिंग केले आणि  स्वयंपाक होईपर्यंत आराम केला.  मग गरमागरम जेवून गुडुप्प झोपलो. रविवारी पहाटे साडेपाचला उठून पटापट आटपले आणि सहाला चालायला सुरुवात केली. आमचे घरमालकही न रेंगाळता रस्ता दाखवायला निघाले. १५-२० मिनिटात त्यांनी आम्हाला वाटेला लावून दिले आणि पुढच्या वाटेच्या, वळणांच्या खाणा-खुणा सांगितल्या. पाइपलाइनला धरुन जा म्हणजे गावात जाल हे आम्ही लक्षात ठेवले.

            सोनपिवळी भातशेते डोलत होती. मागच्या वर्षीच्या कुंजर-कलाड- भैरव ट्रेकच्या आठवणी येत होत्या. शेताच्या बांधा-बांधानी चालताना स्वच्छ हवेत श्वास भरुन घेत मजेत चाललो होतो. दवबिंदूंनी शेते न्हायली होती. अस्वलखिंडीच्या ट्रेकमध्येही सकाळी गवतावर चमचमणारे दवबिंदू मनावर अनोखी जादू करत होते. वाऱ्यावर डोलणाऱ्या शेतांच्या लहरीमध्ये आपणही गुंग होऊन जावे अशी मनाला भुरळ पडत होती. हवेत सुखद गारवा होता. या सगळ्या गमती-जमतीमध्ये आम्ही वाट सोडून पुढे गेलो. मग थोडे मागे फिरल्यावर मधुला ओढ्याच्या पलीकडचा खुणेचा पाइप दिसला. आणि पुन्हा ओढा पार करुन आम्ही पेठाच्या वाडीकडे झपाझप निघालो. आठ वाजून दहा मिनिटे झाली होती पण आठला सुटणारी जीप अजून उभी असलेली बघून हायसे वाटले. जीपवाल्या दादांना हुडकून काढले. ते आम्हाला आत्ता पाचनईला आणि दुपारी पाचनईहून राजूरला सोडायलाही तयार झाले.आम्ही मुकाट्याने सीटवर जाऊन बसलो होतो. मधुला मागे शिडी लावलेली बघून टपावर जाऊन बसायची लहर आली. मधु व केतकी शिडीवरून टपावर जाऊन बसले. ती गाडीच्या टपावरून प्रवास करण्याची मजा  मी पावनखिंडीला  मनसोक्त अनुभवली आहे. पण आज मला  सौरकुंडी पासचा ट्रेक झाल्यावर आम्ही दहा - पंधरा जण फिरायला गेलो होतो आणि त्यावेळी कंडक्टरकडे लहान मुलांसारखा हट्ट करून उन्हामध्ये टपावर जाऊन बसलो होतो; त्याची मजा आठवली. हिमाचल परिवहन ची मोठी बस वळणा-वळणाच्या रस्त्यावर वाट काढत चालली होती. आमची टपावर धमाल चालली होती. आणि १५-२० मिनिटात बस कंडक्टरनी आम्हाला मुकाट्यानी खाली यायला लावले होते. कारणआम्ही खाली आलो नसतो तर ट्रॕफिक पोलिसांनी बस अडवली असती.     
          पेठाची वाडी ते पाचनई रस्ता मागच्या वेळपेक्षा जरा ठीक वाटला. सियाझला ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे  या रस्त्यावर गाडीतल्या सगळ्यांना खाली उतरून चालावे लागले होते . पाचनईमध्ये भास्करच्या अंगणात गाडी थांबली. पाण्याच्या बाटल्या, खाऊ इत्यादी बरोबर घेऊन भास्करकडे फक्कड चहा घेतला; आजच्या दिवसातला पहिला चहा. चटकदार लिंबू-मिरची, पराठे, ठेपले, मोहनथाळ इ. खाऊन घेतले. पहाटेपासून लवकर उठल्यामुळे भूकही सडकून लागली होती. दुपारी तीन - चार वाजता येतो असे सांगून भास्करचे अंगण सोडले आणि गडाच्या दिशेने आगेकूच सुरू केले. नळीची वाट आणि टोलार खिंडीची वाट; हरिश्चंद्रगडाकडे जातानाच्या अनेक आठवणी होत्या. महाशिवरात्रीची गर्दी, नळीच्या वाटेवरचा थरार, बेल पाड्यातील ती रात्र, पहाटे उगवलेली शुक्राची चांदणी, कोकणकड्याचे रौद्र रूप, कोकण कड्यावरचा झंजावाती वारा आणि काय - काय ... पाचनईकडची वाट तुलनेने सोपी होती. सौम्य  चढ माफक, सावली आणि हवा तर कमाल होती. डोंगरात धबधबे पडत होते. लोक त्यात मौज करत होते. कोणी नविन ट्रेकर्स अनुभवी लोकांच्या मदतीने कठीण वाटणारे टप्पे पार करत होते.अधून-मधून लिमलेटच्या गोळ्या तोंडात टाकत आम्ही हळूहळू वर पोहोचलो.
वरच्या ओढ्यावर बागेत असतो तसला एक छोटासा पूल झालेला दिसला. मग त्या पुलावर थोडे फोटो काढले.  धबधब्याकडे पाय वळत होते पण तिकडे परतताना जाऊ असा विचार  केला. पुलावरून पटापट देवळाकडे पोहोचलो. देवळासमोरच्या पठारावर कॅम्पिंग केले होते. देवळासमोर मोठी पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या बाजूच्या भिंतीमध्ये अनेक कोनाडे आहेत. त्या प्रत्येक कोनाड्यात विष्णूची एक - एक मूर्ती होती.  त्या मूर्ती आता देवळासमोरच्या आवारात नेऊन ठेवल्या आहेत, अशी माहिती मधुनी दिली. केदारेश्वराचे आठव्या शतकामधील हे मंदिर, अमृतेश्वराचे मंदिर आणि जळगावच्या पुढचे झोडगे मधील शंकराचे मंदिर यांच्या  बांधणी मध्ये खूपच साम्य  आहे. हरिश्चंद्रगडाला फार प्राचीन इतिहास आहे. वाघावर बसून ज्ञानदेवांना भेटायला  आलेल्या चांगदेवांचे गडावर वास्तव्य होते. तसेच राजा हरिश्चंद्रही तपाचरण करण्यासाठी गडावर वास्तव्यास होता. एक राक्षस होता त्याच्या तपश्चर्येनी शंकर प्रसन्न झाले. आणि त्यांनी त्याला वर दिला की तो काहीही खाऊ शकतो; तो काहीही म्हणजे काही वेळा स्वतःच्या शरीराचे भागही खात असे. या राक्षसाच्या शिराच्या मूर्ती मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहेत. बहुतेक शंकरांच्या मंदिरांमध्ये या राक्षसाच्या मूर्ती  असतात.  गडावर बरीच गर्दी होती. मंदिरातही काही मंडळी राहिलेली होती.देवाला मनोभावे हात जोडले. विठ्ठल - रखुमाईचेही दर्शन घेतले. मंदिराच्या आतल्या टाक्यांमधले पाणी भरपूर पिऊन  बाटल्यांमध्ये भरून घेतले आणि तिथून कोकणकड्याकडे जायला निघालो. वाटेत मधुनी त्याचा कोकणकडा रॕपलिंगचा  अनुभव सांगितला. त्यांनी तीन टप्प्यात कोकणकडा रॕपलिंग केले होते. एक टप्पा संपला की ट्रॅव्हर्स मारुन पुढचा टप्पा गाठण्यासाठी जायचे, मग पुढच्या टप्प्यावरही असेच. हा रॅपलिंग चा अनुभव खरंच आवर्जून  घ्यावा असाच आहे, कधी योग येतो बघू. वसंत वसंत लिमये यांनी या कोकणकड्यावर सर्वप्रथम प्रस्तरारोहण केले.  केतकीला मी सांगत होते, कोकण कड्यावरून नाणं टाकलं तर वाऱ्यानी ते परत वर येतं, असा भन्नाट वारा असतो. वाऱ्यामुळे  आपण तिथे उभे राहू शकत नाही, त्यामुळे आडवे                                                                                       झोपूनच कडा बघता येतो. पण आज तो

वारा नव्हता. मात्र हवा स्वच्छ असल्यामुळे माहुली, नवरा- नवरी- वराडे, चंदेरी, मलंगगड हे आपल्या ठाणे जिल्ह्यातील किल्ले दिसत होते. आम्ही थोडे फोटो काढून ते विलोभनीय अप्रूप अनुभवून, वारा पिऊन घेतला. मधुनी सांगितले की भास्करकडे कढी - भात तयार आहे. दुपारचा सव्वा वाजला होता. पिठलं-भाकरी मिळत असेल तर इथेच जेवावे असे ठरले. मधु सांगायला गेला.  तेवढयात आम्ही रेलिंगच्या पलीकडे पोहोचलो. डोंगरातून पडणाऱ्या धारांच्या तुषारांनी सुंदर खेळ मांडला होता. पण खूप दूर असल्यामुळे क्लिप खास आली नाही. हे अद्भुत अनुभवल्यावर मग पुन्हा फोटो झाले, नंतर फलाहार - सफरचंद सुकामेवा इत्यादी; सफरचंद फारच गोड लागत होते. हात-पाय-तोंड धुवून  भास्करकडे जेवायला बसलो. झणझणीत पिठलं, खरपूस भाकरी आणि चटकदार ठेचा तर आमच्या समोरच मिरच्या भाजून कुटला; असा जेवणाचा थाट होता. जेवणावर यथेच्छ ताव मारला. वर कढी -भात खाऊन आत्माराम तृप्त झाला. कोकण कड्यावरच्या या चुलीवरच्या जेवणाची सर दुसऱ्या कशालाच येणार नाही. मुखशुद्धी खाऊन बूट घातले आणि वाटेला लागलो. वाटेत धबधब्यापाशी पाच मिनिटे शांत बसून उतरणीला लागलो. उतारही फार तीव्र नसल्यामुळे उतरताना खासच मजा येत होती. हे सारे पहाड मागे ठेवून जायला जीवावर येत होतं. केतकी  हरिश्चंद्रगडावर येऊन राहण्याचे मनसुबे रचत होती. मला पण शनिवार - रविवार सोडून इतर दिवशी सुट्टी काढून एथे शांत येऊन राहायला आवडेल. हरिश्चंद्र, तारामती सगळ्या शिखरांवरही जाता येईल. मधुच्या, माझ्या, शेखरच्या हरिश्चंद्रगडाच्या ट्रेकच्या आठवणींमध्ये हरवत आणि आजूबाजूचे डोंगर निरखत आम्ही  कधी खाली पोहोचलो ते समजलेच नाही. भरपूर डुलक्या येत असल्या तरी रस्ता मात्र संपूर्ण  खडखडाट होता. पाच वाजता राजूराला पोहोचल्यावर  समजले की आता कसाऱ्याला जायला बस-जीप कोणतेच वाहन नाही.  मग दहा जणांच्या एका ग्रुपनी जीप ठरवली होती त्या  ग्रुपमध्ये आम्हीही गेलो.  ट्रकचे ब्रेक नादुरुस्त होऊन सतरा वाहने उलटून अपघात झाल्यामुळे घाटामध्ये ट्रॅफिक जाम झाला आहे, अशी माहिती आमचा चालक देत होता. इगतपुरीला डिझेल भरताना त्यानी भाड्याचे पूर्ण पैसे मागून घेतले. आता  इगतपुरीला सोडतो, नाहीतर घाटामध्ये  कुठेतरी ढाब्यावर गाडी थांबवतो तिथे जेवा, मी दोन तास आराम करुन मग कसाऱ्याला सोडीन अशी भाषा त्यानी सुरु केली.  इगतपुरीला सुदैवानी एक एक्सप्रेस मिळाली. गाडीतच जेवण मागवले आणि पावणेबाराच्या सुमारास गाडीनी ठाण्याला सोडले,  अनुभव व आनंद यांच्या जाणिवा अधिक समृद्ध करुन...

     
           
             





Tuesday, January 28, 2020

तोरणा ते राजगड

                 तोरणा ते राजगड  (दि.१४-१२-१९ ते १५-१२-१९)        

               शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीला घेतला तो तोरणा किल्ला. या किल्ल्यावर तोरण जातीची खूप झाडे आहेत  म्हणून तोरणा म्हणतात की महाराजांनी हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून तोरणा माहीत नाही; पण या किल्ल्याचा प्रचंड आकार बघून महाराजांनी याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. गडाची दुरुस्ती करताना या किल्ल्यावर पुरून ठेवलेले धनाचे २२ हंडे सापडले. हे धन महाराजांनी तोरण जाई देवीचे मंदिर बांधण्यासाठी, गडाच्या दुरुस्तीसाठी वापरले आणि त्यातूनच जवळच्या मुरुंब डोंगरावर राजगड हा किल्ला बांधला. १७०४ मध्ये औरंगजेब, नंतर मराठे  आणि शेवटी इंग्रजांकडे गडाचे हस्तांतर झाले. ज्याप्रमाणे योद्धा लढताना अंगाखांद्यावर चिलखत चढवतो त्याच प्रमाणे शत्रूचा मारा अंगावर घेणाऱ्या तटबुरुजांच्या बाह्य अंगाला संरक्षण देण्यासाठी काही ठिकाणी त्यांच्या तळापासून जवळच , काही सहाय्यक तटबंद्या उभारल्या गेल्या. या अनन्‍यसाधारण लष्करी शिल्पाची सारी गुणवैशिष्ट्ये राजगडाचा संजीवनी आणि सुवेळा या माच्यांच्या चिलखती बांधणीत पूर्णतया साकार झालेली आढळतात. राजगड ही जशी प्रामुख्याने शिवाजीमहाराजांची उभारणी त्याचप्रमाणे ही त्यांची पहिली दुर्गबांधणी. चिलखती बांधणी हे नाव सार्थ ठरविणारा राजगड इतका अभेद्य ठरला की त्याने पहिल्या राजधानी पदाची तब्बल वीस वर्षे यशस्वीपणे धुरा वाहिली आणि तीसुद्धा सुरुवातीच्या अस्थिरतेच्या काळात शिवाजीराजे सामर्थ्य आणि सुरक्षितता यांच्या शोधात, पारतंत्र्याच्या अंधारात चाचपडत असताना! युरोपात ल्युसेर्न येथे जगातील वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांच्या प्रतिकृतींचे संग्रहालय आहे. त्यात एका राजगडाचाच एकमेव समावेश आहे. हा सन्मान आहे अजोड अशा या लष्करी शिल्पाचा!


           शनिवारी पहाटे साडेपाचला गाडी ठाण्याहून निघून गाडी वेल्ह्याच्या दिशेने भरधाव निघाली. केतकी आणि किशोरी मागे तर प्रसाद पुढे बसला. रात्री  बारा ते पहाटे पावणेचार एवढीच झोप आणि ट्रेकची प्रचंड उत्कंठा; खूप दिवसांनी या ट्रेकचा योग जुळून आला होता. गप्पांच्या ओघात एक-एक गाव मागे पडत होतं. जुन्या ट्रेकच्या आठवणींना उजाळा मिळतानाच नवीन विषयांनाही तोटा नव्हता. आमच्या नेहमीच्या सवंगड्यांची अनुपस्थिती जाणवत होती. गाडीमध्ये डिझेल भरून आणि हवा तपासून निघालो ते थेट शिवनेरी मिसळलाच थांबलो. मराठे सर नसल्यामुळे कुठे नाश्ता छान मिळेल हे सांगणारे कोणी नव्हते. इथे फक्त मिसळ आणि भेळच होती. इथली मटकी भेळ म्हणजे भेळेचा निव्वळ आळशी प्रकार; शेव-कुरमुऱ्यांवर फक्त कांदा तोही अगदी कमी टाकून दिला होता. भेळ, मिसळ आणि वर एक-एक चहा घेतला.
          ठाण्याहून वेल्ह्याला जाण्यासाठी तीन रस्ते आहेत. त्यापैकी  सिंहगड रस्ता जवळचा पण खराब आहे. नसरापूर रस्ता उत्तम  पण थोडा लांबचा आहे. आम्ही मधला कोंढरपूर मार्गे जाणारा  रस्ता निवडला. कात्रज बोगदा मागे गेला होता.शिवनेरी मिसळनंतर लगेच डावीकडे वळलो आणि वेगाला लगाम लागला  कारण रस्ता बरा पण छोटा होता; २-३ जागी तर फारच खराब  होता. बाराव्या सुमारास वेल्हा बस थांब्यासमोरील मैदानात गाडी लावली आणि बूट मोजे घालून आणि सॕक घेऊन गाडीबरोबर एक सेल्फी काढून ट्रेकसाठी सज्ज झालो. नाश्ता तुडुंब झाला होता त्यामुळे तोरणा विहार मधून पिठलं -भाकरी बांधून घेतली आणि कदमांना रस्ता विचारुन तोरण्याकडे निघलो.आम्हाला त्यांनी काँक्रीटचा रस्ता न सोडण्याचा सल्ला दिला होता म्हणून मध्ये वर चढणारी पायवाट दिसत असूनही आम्ही  रस्ता सोडला नाही. सुरुवातीलाच उन्हातून चालताना त्या रस्त्याचा अगदी कंटाळा आला.पण समोर दिसणारा प्रचंडगड बोलावत होता. तोरणा ते राजगड ट्रेकचा जीपीएस् ट्रॕक डाउनलोड करण्याचा आमचा प्रयत्नही नेटानी सुरु होता. पण ते काही होईना मग तो प्रयत्न सोडून दिला.
         वाटेत पुण्याहून दीड वर्षाच्या अंशिकाला घेऊन आलेले एक जोडपे  भेटले,अंशिकाला आमचे लाल-निळे ट्रेकिंग पोल फारच आवडले. ती दोन हातात दोन पोल घेऊन आमच्याबरोबर तुरु-तुरु तोरण्याकडे निघाली. आई-बाबांकडे बघायलाही तयार नव्हती.काँक्रीटचा रस्ता संपल्याचा आनंद एक मोठा ग्लास लिंबू सरबत पिऊन साजरा केला.मग लाल चुटूक मातीची पायवाट उभा चढ चढू लागली. आज विशेष घाई नव्हती. आम्ही  मजेत चाललो होतो.गुंजवणे धरणाचे मनोहर दृश्य  बघत वाटेत टेकलो होतो. तेवढयात पुण्याहून ट्रेकसाठी आमच्याबरोबर येणार असलेला अमित त्याच्या मित्राबरोबर येऊन पोहोचला. रविवारी वेळ नसल्यामुळे तोरणा-राजगड ट्रेक करण्याऐवजी एका दिवसात फक्त तोरणा करण्याचा तह त्यानी केला होता. त्यामुळे ते दोघे सगळा काँक्रीट रस्ता बाइकवर आले. पण आम्हाला दुसऱ्या दिवशी राजगड गुंजवण्याला उतरुन गाडी न्यायची होती. त्यामुळे गाडी खालच्या वाहनतळावरच ठेवली. कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी बस किंवा सहा आसनी रिक्षा वगैरे वाहन मार्गासनी वरुन मिळू शकते. अडीच -तीन वाजले तशी भुकेची जाणीव होऊ लागली. मग एका झाडाखाली बसून झणझणीत पिठलं-भाकरी चवीनी खाल्ली. वर आजीकडे परत एक ग्लास लिंबू सरबतही घेतले. मग गडी ताजेतवाने होऊन पुन्हा निघाले. वळणा-वळणावर गुंजवणे धरणाचे दृश्य दिसत होते. सभोवार नजर फिरवली की मनाला आल्हाद मिळत होता. अमित त्याच्या मित्राबरोबर गडाला भोज्जा करुन परत जाताना भेटला. बहुतेक ग्रुप तोरणा उतरत होते. एकमेकांची विचारपूस तुम्ही कुठून वगैरे होत होती.आम्ही तोरणा-राजगड करणार हे ऐकून कोणाच्या चेहऱ्यावर किंचित असूया तर कोणाचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळत होते. पुण्याचे दोघे म्हणाले की कधीपासून हा ट्रेक करायचा आहे पण ग्रुपच जमत नाहीये.आम्ही  म्हटलं की मग चला परत आज तुम्हाला ग्रुप तयार मिळालाय अनायसे.
           मी आणि किशोरी पुढे तर प्रसाद आणि केतकी थोडे मागे होते. तेवढयात प्रसादनी आवाज दिला, 'नमिता, मागे ये, दगड  पडलाय' मला कळेना दगड पडलाय तर मी काय करु; बाजूनी या म्हणावं. पण पुन्हा हाक आली तशी मी खाली गेले. वर बसलेल्या माकडांनी एक मोठा धोंडा खाली ढकलला होता,आणि तो केतकीला डोक्याला आणि हाताला चाटत गेला होता. केतकीची काय अवस्था झाली असेल यची मला कल्पना आली; कारण मी सांधण दऱ्याला हा अनुभव घेतला होता. फक्त तिथे दगड ढकलणारी माकडं नव्व्हती तर ते आपोआपच कोसळत होते. असा एखादा  दगड आपल्या डोक्यात  पडला तर काय होईल या विचारानी काही सुचत नाही. प्रसादनी केतकीला पाणी वगैरे दिले आणि धीर देऊन हळुहळू पुढे घेऊन आला.मी थोडी खाली जाऊन ते निघेपर्यंत जरा थांबले कारण सॕक सोडून जायची सोय नव्हती.  वानरसेना तर टपूनच बसली होती. सुदैवाने केतकीला फक्त  थोडे खरचटले होते. ती लगेच सावरली आणि चालू लागली. पण पाच मिनिटे   तरी विचित्र  थरार अनुभवला.
          लवकरच  बिनी दरवाजा आला आणि मग कोठी दरवाजा. तोरण्यावर दुरुस्तीचे बरेच काम झालेले दिसते. त्यामुळे किल्ल्याच्या दरवाजातून प्रवेश करतानाचा अनुमव  वर्तमानकाळ आणि भूतकाळ यांना जोडणारा होता. गडावर बरीच मंडळी मुक्कामी  आहेत अशी माहिती वाटेत मिळाली  होती. आम्ही खोकड टाक्याजवळ  अंबारखान्यातील एका खोलीत आमच्या  सॕक ठेवल्या आणि ग्लास काढून तोरणाविहार मधून आणलेला गरमा-गरम चहा प्यायला. आता पाणी  भरणे आवश्यक होते. किशोरी बूट मोजे काढून टाक्यात उतरायला सज्ज  झाली. टाके १०-१२ फूट खोल होते आणि कोपऱ्यातले जिवंत झऱ्याचे पाणी पिण्यासाठी भरायचे होते. उतरायला पायऱ्या वगैरे नव्हत्या. उतरु तर भले पण चढताना गंमत येणार. किशोरीनी पांढरे निशाण फडकवल्यावर मी प्रसादला मोठ्या मनानी संधी दिली.आणि तो गडीही हिंमतीनी खाली उतरला. टाक्यातले थंडगार पाणी पिऊन अपार आनंद  अनुभवला आणि गडफेरीसाठी निघालो. बुधला माचीकडे मावळतीच्या रंगांची उधळण सुरु झाली होती. दूरवर लिंगाणा आणि रायगड दिसत होते. एकदा तोरणा रायगड ट्रेक करायचा मानस  आहे, आणि लिंगाण्याची चढाईही. तूर्तास डावीकडे दिसणारा राजगड आणि राजगडाकडे धारेवरुन जाणारी वाट नीट पाहून घेतली. मग केतकीनी अमेयला जळवायला व्हिडिओ काॕल लावला तो बिचारा प्रिलिमचा शेवटचा पेपर बाकी असल्यामुळे ट्रेकला  येऊ शकला नव्हता. मावळतीच्या रंगांमाध्ये न्हाऊन निघालेल्या अशा ङोंगररांगा या जगापासून दूर एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातात. मागच्या डिसेंबरमन्ये आम्ही रतनगडावर होतो . दीपश्री आणि अमेयची खूप आठवण येत होती. बुधला माचीवर संतोष ढेबे भेटले. तोरणा-रायगड ट्रेकला ते वाट दाखवायला येईन म्हणाले. त्यांचा नंबर लगेच घेतला. तोरणा ते राजगडच्या वाटेवर एकमेव घर आहे ते त्याच्या मामांचे आहे.
           आता अंधार दाटू लागला. आम्ही तटबंदीवरुन चालत थोडे फिरु या म्हणून निघालो. महार टाके लागले. किशोरीनी तिच्या  ट्रेकिंग पोलला सायकलचा दिवा लावून आणला होता. त्यामुळे त्याच्या  प्रखर प्रकाशझोतात  टाके नीट पाहता आले. तिथे जवळच तटबंदीवर बांधकामाचे साहित्य आणण्यासाठी ट्राॕलीला पुली लावलेली होती; त्यात भगवा ध्वज अडकून फडकत होता. तिथून मेंगाई देवीच्या  मंदिरात जाऊन दर्शन घेतले.तिथे वीस जणांचा ग्रुप राहिला होता. संध्याकाळी बुधला माचीवर ते खाली गेले होते. तिथे कोणीतरी जाळ केल्यामुळे मधमाश्या पिसाळून त्यांच्या ग्रुपमध्ये काहीजणांना  चावल्या होत्या. त्यातल्या एकाची परिस्थिती जरा गंभीर झाली होती. मधमाश्यांनी हल्ला  केल्यास निःस्तब्ध राहावे आणि आरडाओरडा- गोंधळ अजिबात करु नये. तसेच आपले पूर्ण शरीर झाकलेले असावे म्हणजे  कमीतकमी नुकसान  होते असे अनुभवाचे बोल वाचल्याचे आठवले. तिथून मग तोरणजाई देवीच्या मंदिरात गेलो. इथेही मंदिराच्या आवारात तंबू लावलेले होते. पुण्याहून आलेला विनय आणि त्याचा मित्र  यांच्याशी ओळख झाली.  त्यांचा तीस जणांचा ग्रुप रात्री नऊ  नंतर गड चढणार होता.  त्यांना आकाशदर्शनाची खास आवड होती. आज रात्री १२ ते ४ उल्कावर्षाव होणार होता. अवकाशातील हा झगमगता सोहळा अनुभवण्यासाठी ते आज तोरण्यावर आले होते. त्यांच्या कडून केतकीने स्कायवाॕक - २ हे अॕप घेतले आणि आम्हीही आकाशातील ग्रह-तारे न्याहळू लागतो. अजून खूप फिरण्याचा उत्साह होता. पण ढेबे मामांनी रात्रीचे गवतामध्ये साप वगैरे निघतात त्यामुळे जास्त  फिरु नका अशी सूचना केली होती. त्यामुळे आम्ही  आमच्या मुक्कामी परत फिरलो.
            पुदीना-कोबी पराठे, तिखटा- मिठाच्या पोळ्या ,शिरा, सुकी भेळ असे अंगत-पंगत करुन जेवलो. प्रसादला आग्रह  करुनही त्यानी जास्त  काही खाल्ले  नाही. आज तरी काही फार दमणूक झाली नव्हती. पण त्याला  भूकच नव्हती. पहाटे पावणे दोनचा गजर लावून आम्ही  स्लिपिंग बॕगामध्ये शिरलो. अशी गाढ झोप लागाली की पहाटे गजरानीच जाग आली.  पटापट उठून आम्ही  उल्का वर्षाव बघायला निघालो. विनयचा ग्रुप बुरुजावर जाऊन बसला होता. मंदिरासमोरच्या पठारावर त्यांनी शेकैटी केली होती. आम्ही गप्पा मारत त्या शेकोटीभोवती बसलो. त्यामुळे थंडी असूनही वाजात नव्हती.आम्हाला फार प्रतीक्षा करावी लागली नाही.आकाशातून भूतलाकडे झेप घेणाऱ्या ताऱ्यांशी  दृष्टिभेट होऊ लागली. आणि इकडे आडवे होऊन हा अनुभव घ्यावा अशी प्रबळ इच्छा झाली. कोणाला ईशान्येला तर कोणाला नैऋत्येला उल्कापात दिसू लागला. साधारण तासभर हा खेळ बघून आम्ही  पुन्हा  निद्रादेवीच्या आधीन  झालो आणि पहाटे पाचला उठलो. झटपट आटपून मेंगाई देवीकडच्या आजीकडे गेलो. लगेच तोरण्याकडे गेलो असतो पण कालच्या मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे उजाडल्याशिवाय निघू नका असे सगळ्यांनी बजावले होते. आजींनाही चहासाठी येण्याचे कबूल केलेले होते.आजींनी प्रेमानी साखर लोटून केलेला चहा प्यायल्यावर आमच्या कडच्या थर्मासमधला चहाही गरम करुन प्यायला. सोबतीला खारी-गोड बिस्किटे होतीच. इतक्यात पूर्वेकडे उजळू लागले. पूर्वेच्या झुंजार माचीवरुन 'उदयोस्तु भगवन् भास्करा' असे नमन करायचे होते. पण आज राजगडाचा दूरवरचा पल्ला गाठायचा असल्यामुळे गडमाथ्यावरुन प्रथमो मे नमस्कारः प्रचोदनाय मित्राय म्हणून कोकण दरवाजातून खाली उतरायला सुरुवात  केली. बुधला माचीसारखीच पलीकडे झुंजार माची आहे. ही माची बघितली की गडाच्या अजस्त्र आकाराची कल्पना  येते. बुधला माचीच्या थेट टोकावर जाऊन बघितले की पूर्वी जा-ये करण्यासाठी वापरला जाणारा पण आता चिणलेला चिणला दरवाजा दिसतो. पण इतके टोकापर्यंत जायची गरज नाही. कारण राजगडाची वाट थोडी आधीच  उजवीकडून खाली उतरते आणि माचीला वळसा घालत पुढे निघते. इथे जरा घसरडे आहे त्यामुळे जरा जपून जावे लागते. त्यानंतर  शिडीचा जरा रोमांचक टप्पा  आला. किशोरी पुढे राहून सगळ्यांना  काळजीनी सूचना देत होती.  मी माझा कॕमेरा पाउच सॕकच्या आत ठेवून दिला.कारण अडचणीच्या जागी सॕकमुळे पुढे ढकलले जायला व पुढच्या कॕमेरा पाउचमुळे चढताना पाय अडकणे होते. शिडी आणि कातळटप्पा पार केल्यावर  पुढची वाट सुसाट होती. अधे- मधे कुठेही न थांबता साधारण मध्य गाठला की एकमेव घर लागते. ढेबेंचे मामा- मामी तिथे राहतात. तिथेच थांबावे असे ठरले. आज राजगड-तोरणा मॕरॕथाॕन असल्यामुळे मार्गावरील झाडांना वाट कळण्यासाठी भगव्या फिती बांधलेल्या होत्या. राजगडाकडून तोरण्याकडे जाणारे वेगवेगळे  ग्रुप वाटेत भेटत होते. कोणी पहाटे चारला निघाले होते तर कोणी सहाला; मोठ्या ग्रुपमधधले इंजिनचे डबे पुढे, मधले डबे मधे तर गार्डचे डबे सगळे थांबे घेत मागे राहिलेले होते. ते सगळे आम्हाला भेटले. एक ग्रुप पालेघाट उतरुन डांबरी रस्ता लागतो तिथल्या गावात राहिला होता. तोरण्याकडून राजगडाकडे जाणारे उरफाटे वीर फक्त आम्हीच होतो. धारेवरुन सुसाट जाताना चहुकडे ङोंगररांगा आणि मध्ये आपण असे सुंदर दृश्य होते. फार छान वाटत होते. 'राजगड के रस्ते में , कारवी के जंगल में, गाने की धुन-धुन में चले हम जोर-जोर में, शहर से दूsssर.....,'असे शीघ्रकाव्यही ओठी आले. इथून शहरे, रस्ते, वाहने, कोलाहल सगळे दूर होते. जंगल, पक्षी , झाडे, निसर्ग आणि पाच सोबती तेवढे बरोबर  होते. तोरण्यापासून आमच्याबरोबर  दोन काळू आले होते आणि ते आता राजगडापर्यंत येणार याची खात्री  होती. या कुत्र्यांची चालण्याची एक विशिष्ट  शैली असते. ते आधी जोरात पळतात , मग दमतात मग हाsहाsहाsss करत दम खातात आणि मग बाजूच्या झाडीत अदृश्य  होतात. नंतर आपण आपल्या लयीत चालत असताना आपली तंद्री लागली की अवाचित आपल्या वाटेत प्रकट होतात आणि आपण दचकतो. एखाद्या ठिकाणी अवघड किंवा अरुंद वाट असेल तर  हे हटकून आडवे येऊन वाट अडवून ठेवतात. हळुहळू  हे सगळे  आपल्या  अंगवळणी पडते. त्यांना काठी दाखवून पुढे चला म्हणून  सांगितले  तर बिचारे घाबरतात. मी म्हटले, अरे बाळांनो सकाळपासून तुम्हाला एकदा  तरी कोणी मारले वगैरे आहे का? नाही ना, मग कशाला घाबरता?
       आता ढेबेंच्या मामांचे रानातले ते एकुटवाणे  घर आले. त्यांच्या राखणदारानी आमच्याबरोबर  आलेल्या काळू-बाळूंना बघून हा माझा इलाका आहे अशी घोषणा केली. एका झाडाखाली बसून आम्ही  न्याहरी करणार होतो; पण आधी काळू - बाळूला शांत करायला हवे होते. मग आमची श्वानप्रेमी किशोरी बिस्किटं घेऊन त्यांना शांत करायला लांब घेऊन गेली. तिला परत यायला बराच वेळ लागला म्हणून  विचारलं तर त्यांचा हट्ट समजला; बिस्कटं खाली टाकली तर ते खात नव्हते मग हिनी ती त्यांना प्रेमानी भरवली. मग शिरा, पराठे, खाकरे वगैरे आम्ही  तिघींनी खाल्ले, प्रसादनी पुन्हा  काहीच खायला भूक नाही म्हणून  सांगितले. त्यानी अगदी एखादा चमचा शिरा चाखत- माखत खाल्ला  आणि थोडे टँग प्यायले. टँग, इलेक्ट्राॕल दोन्ही  एक-एक पाकीट टाकून सरबत तयार ठेवले होते. तिथे पाण्याच्या  दोन बाटल्याही भरुन घेतल्या. हे मामा सगळ्या  ग्रुप्सचे नंबर वगैरे लिहून ठेवतात. इथे मुंबईच्या साद अॕडव्हेंचर्सचे ट्रेकर्स आले होते. त्यांनीही त्यांच्या वहीत मामांचा नंबर लिहून घेतला. आता तोरणा मागे राहून राजगड जवळ दिसायला लागला होता.
       वाट खूप छान होती. वातावरणही थंड होते. मध्येच कारवीनी गर्दी केली होती. सोनकी फुलली होती. मोकळ्यातून जातानाही उन्हाचा चटका जाणवत नव्हता. लवकरच डांबरी रस्ता लागला.रस्ता  ओलांडल्यावर पाले खिंडीतून वाट चढू लागली. हा चढ छान वाटला. आता पटापट राजगडावर पोहोचू असे वाटले, कारण किल्ला अगदी दृष्टिपथात आला होता. पण चढ संपून आम्ही मोकळ्या जागेवर पोहोचलो आणि पुन्हा उतार सुरू झाला. आता ऊनही जाणवू लागले होते. प्रसादला पायात गोळे यायला लागले. त्यामुळे थोड्या-थोड्या वेळानी थांबण्याची गरज भासू लागली. पुन्हा चढ सुरू होऊन एक छोटा कातळ लागला. वेळेचे गणित जमण्याची शक्यता जरा कमी होते आहे की काय? अळू दरवाज्यातून बाहेर पडून मॅरेथॉन साठी धावणारे गडी दूरवर दिसू लागले. राजगडाची संजीवनी माची ही बालेकिल्ल्या पासून बरीच दूर आहे. राजगडावर दोन-तीन वेळा मुक्कामी येऊनही ही बाजू बघितली नव्हती. संजीवनी माचीचा अळू दरवाजाशी येऊन पोहोचलो. प्रसाद काही न खाता नुसता सरबतावर तग धरून होता. किल्ल्यात प्रवेश केल्यावर माची वरती पाण्याची तीन टाकी लागली. पाणी स्वच्छ दिसत होते. थोडे पिऊन चव बघितली आणि थंडगार पाणी तोंडावर मारून तजेला आला. प्रसाद दोन वर्षांपूर्वीच हा गड सफाईसाठी राजगडावर आला होता हे योग्य वेळी  आठवले. पाण्याच्या  रिकाम्या बाटल्या भरून झाल्यावर त्याला आणि किशोरीला म्हटलं की तुम्ही तिघे चोर दरवाज्याने राजगड उतरून या. वाटेत पिठलं-भाकरी वगैरे पद्मावती माचीवर मिळेल ते जेवून घ्या. गुंजवण्यावरून काही वाहन मिळाले तर मार्गासनी पर्यंत या किंवा तिथे थांबून राहा. मी पुढे जाते आणि वेल्ह्याला जाऊन गाडी घेऊन येते. चोरदरवाजाची वाट माहीत असल्यामुळे किशोरी आणि केतकी यांना बरोबर घेऊन येईन असे सांगून प्रसादनी मला आश्वस्त केल्यावर मी तडक निघाले. खरं तर चार जणांच्या ग्रुपमध्ये शेवटपर्यंत सगळ्यांनी एकत्र गेलेलेच चांगले असते पण त्यासाठी फार जास्त वेळ लागणार होता. त्यामुळे नाईलाज होता. संजीवनी मातीवरची मजबूत चिलखती तटबंदी रेखीव दिसत होती. अवाढव्य बालेकिल्ला मध्ये होता आणि दूर पद्मावती माचीवरती माणसांची झलक अधून-मधून दिसत होती. गडफेरी करत संजीवनी माचीपर्यंत आलेले दोघे भेटले. त्यानंतर मात्र मी एकटीच वाटेनी चालत होते. डावीकडे पाली दरवाजाची वाट उतरताना दिसत होती. बालेकिल्ल्याची ही बाजू मी प्रथमच बघत होते. मागच्या वेळी बालेकिल्ल्यावर गेलो होतो तेव्हा वरच्या टाक्यांमध्ये पाणी मे महिन्यामुळे खूप खोल होते; तेव्हा मेधाच्या ओढणीला बाटली बांधून पाण्यात सोडून पाणी काढले होते ते आठवत होते.यावेळी खाली उतरुन पुढे ठाणे गाठायचे होते त्यामुळे बालेकिल्ल्यावर जाणे शक्य नव्हते. वाटबालेकिल्ल्याला प्रदक्षिणा घालून वाट खाली पठारावर आली. अंबारखाना, नगारखाना फरसबंद करुन गडावर बरेच बांधकाम झालेले दिसत होते. रविवार  असल्यामुळे किल्ल्यावर बरीच गर्दी होती. पद्मावती देवीला व शंकराला नमस्कार करुन पुढे निघाले. पद्मावती टाके निखळ पाण्यानी तुडुंब भरले होते.  पुणे परिसरातून बरेच हौशी ट्रेकर्स मोसावरुन दोघे-दोघे आले होते. ठाण्याचा एक ग्रुप मिनी बस करुन आला होता.बरीच मुले पटापट उतरत मग थोडं विसावत, सरबत- पाणी पित चालली होती. मी पुढे जाणाऱ्यांना वाट देत माझ्या लयीने चालले होते . वाटेत एकदाच पाणी पिऊन पद्मावती माचीवरुन साधारण दोनच्या सुमारास निघून मी सव्वाचारला खाली पोहोचले आणि चारचाकी वाहनांची पार्किंगची सोय होती तिथे हॉटेलच्या बाकड्यावर बसून कोणी गाडीकडे येत आहे का याची वाट पाहू लागले. तसेच मार्गासनीला जायला काही वाहन मिळेल का याची चौकशी केली. पण फार वाट बघावी लागली  नाही. समोरच्या नव्या कोऱ्या गाडी कडे एक जण आला. एकटाच निघतोय म्हटल्यावर मी त्याला मार्गासनीपर्यंत सोडाल का असे विचारता त्यानी सांगितले  की हो फक्त  तिथपर्यंतच सोडू शकतो कारण मार्गासनीला माझे मित्र माझ्या प्रतीक्षेत आहेत. याचे नाव मयुर रणशिंगे, तोही ठाण्याचाच होता. वाटेत त्यांच्यातले दोघे आम्हाला भेटले  होते; डांबरी रस्याकडे येऊन तिथे मुक्कामी होता तो यांचाच चौघांचा ग्रुप. आणि विशेष म्हणजे मयुरनी मला बरोबर ओळखले. आम्ही युथ होस्टेल मुंबईबरोबर AMK ट्रेक एकत्र केला होता. मग गप्पा  सुरु झाल्या. मयूरकडून नसरापूर रस्ता उत्तम असल्याचे कळले तर कोंढरपूर मार्गे जवळचा रस्ता असल्याचे मी त्याला सांगितले. वेल्ह्याला वाहन तळासमोरच बस थांबा होता. जोपासू डस्टरनी झटपट गाडी पुसली आणि तोंड धुवून ताजी-तवानी होऊन मी लगेच गुंजवण्याकडे निघाले. प्रसादचा लगेच फोन आला आम्ही पंधरा मिनिटात खाली पोहोचतो, मीही तोपर्यंत गुंजवण्याला येईन, तुम्ही तिथेच थांबा असे ठरले. सव्वा सहाला गुंजवण्यात पोहोचून पुन्हा त्याच हॉटेलच्या बाकड्यावर मी तिघांची वाट बघू लागले. सगळ्यांसाठी चहा आणि बटाटेवडे आणायला सांगितले. माझा फोन डिस्चार्ज झाला होता त्यामुळे हॉटेल मालकांच्या फोनवरुन प्रसाद केतकी आणि किशोरी तिघांनाही फोन लावला पण कोणालाच रेंज नव्हती. थोडी वाट बघावी नाहीतर जाऊन शोधावे असा विचार करुन बसले होते. पाच-दहा मिनिटांत किशोरी आली आणि केतकी आणि प्रसादही मागोमाग पोहोचले. चहा,वडे, मँगोला, वेफर्स, भेळ इ. खाऊ खाऊन आम्ही साडेसातच्या दरम्यान ठाण्याकडे निघालो. ट्रेक तर झकास झाला एवढी जबरदस्त चाल असूनही कोणालाही विशेष काही त्रास झाला नाही. याचे समाधान आणि आनंद ओसंडून वाहत होता. मागच्चे ट्रेक्स, गाणी, नाटक, सिनेमे अशा भरपूर गप्पा झाल्या. किशोरीला उद्याची अॉफिसमधली मिटिंग दिसत होती त्यामुळे ती थोडी झोप काढण्याच्या विचारात होती. त्या दोघांनी हुशारीनी केतकीला पुढे बसवले होते. आता नेटवर्क आल्यामुळे केतकीचे एकीकडे चॕटिंग आणि फोन सुरु झाले. मीही घरी फोन करुन मला जेवायला काय मिळेल असे विचारले. आमचा मित्र  मधू देहानी जरी कळव्यात असला तरी मनानी मात्र आमच्याबरोबर  होता. सतत संपर्कात राहून आमची आस्थेनी चौकशी करत होता. त्यामुळे त्याला फोन लावून त्याच्याशी सगळ्यांनी गप्पा  मारल्या. पुढच्या ट्रेकचे मनसुबे      रचले जाऊ लागले. गाण्यांच्या जादुई स्वरांनी ट्रेकचा आनंद द्विगुणित झाला. रस्त्यात ट्रॕफिकमुळे बराच खोळंबा झाल्याने ठाण्याला पोहोचेपर्यंंत रात्रीचे बारा वाजले.