Thursday, August 25, 2022

मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम, भाग-२

 मनाली-लेह-खारदुंगला सायकल मोहीम, भाग-२


"कधी पर्वतराजी विशाल, कधी अफाट हिरवी राने 

 कधी झुळझुळत्या गिरीबाला, कधी रेतीची मैदाने 

  गंगेपासून तुंगेपावत अखण्ड हे वरदान, 

  अमुचा देश महान...."

कवि वसंत बापट यांच्या या ओळींची अक्षरशः प्रचीती या प्रवासात रोज येत होती. मोहीमेचा आजचा सहावा दिवस, जिस्पा (१०५००फूट) ते झिंग-झिंग बार (१४०००फूट) अशी फक्त ३१ किमी ची राइड होती. दूरवर दिसणारी हिमशिखरे, निळे डोंगर, हिरवी राने, हिरव्या रानात सोनपिवळी पिटुकली फुले, अहाहा; नयनरम्य रस्ता होता. 

दारचा पूल हा हिमाचल प्रदेशातील भागा नदीवरचा सगळ्यात लांब पूल; त्यानंतर आणि त्याआधी छोटे-छोटे पत्र्याचे पूल खडखड करीत ओलांडले होते. लांबच-लांब रस्ते, गावं वगैरे नव्हतीच, वाटेत फक्त सैन्याचे छोटे-मोठे तळ आणि तपासणी नाके लागत होते. डोंगरातून ओढा रस्त्यावर उतरला होता. त्या ओढ्याच्या थंडगार पाण्याचा स्पर्श जादुई होता.ओढा ओलांडतानाच पाऊस सुरु झाला.

             झोकदार वळण घेऊन चढून गेल्यावर दीपक ताल आला. तलावाला ताल हा हिंदी प्रतिशब्द फार गोड वाटतो. आसपासच्या विविधरंगी छटा या नितळ पाण्यात उमटल्या होत्या. विहंगम भूदृश्याचे प्रतिबिंब त्यात लख्ख दिसत होते. या तलावाला फेरी मारली तर एक कुंडं दिसते. क्षणभर काठावर विसावायला अगदी सुख वाटले. इथे बाइकर्स भेटले. सायकल मोहीमेबद्दल त्यांना कुतुहल होते. काहींनी तर चक्क नवनवीन साहसांसाठी तुमच्या कडून प्रेरणा मिळेल म्हणून बरोबर सेल्फीही घेतले; खूप भारी वाटले. 

  वाहत्या पाण्यानी, कोसळणाऱ्या दगड-गोट्यांनी, दरडींनी अनेक ठिकाणी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. कधी त्यांना ओलांडून तर कधी त्यांना बगल देत आपला मार्ग चोखाळावा लागतो. बाॕर्डर रोड आॕर्गनायझेशन आपला मार्ग सुकर करण्यासाठी दिवस रात्र खपत असते. त्यांना आपसूकच आपण मनापासून सलाम ठोकतो.
             आता वाटेत एका ठिकाणी नदी ओलांडायची होती. खाली दगड-गोटे, चिखल होता. जमेल तेवढं सायकलवर स्वार होऊन तर काही ठिकाणी पायउतार होऊन हा टप्पा पार करताना आजू-बाजूला बाइकर्स येत जात होते; त्यांना हे साहस केवळ बाइकवर स्वार करुनच करावे लागत होते आणि हे अवघड होते. लवकरच झिंग झिंग बार कँपसाइट आली. निळ्या आकाशातून एक शुभ्र ढग गडद तपकिरी पर्वतरांगांवर उतरत होता.
 झिंग-झिंग बार ते सारचू प्लेन (१४०७० फूट) हे ५४ किंमी चे अंतर कापताना आज बारालच्छा ला (१६०४५ फूट) पार करायचा होता. दोन शिखरांच्या मध्ये ला म्हणजे पास असतो. इथे भन्नाट वारा आणि उंची असल्यामुळे थंडी असते. वरुणराजा कधी बरसू लागेल काहीच नेम नसतो. एकीकडे उंच डोगर, अधूनमधून त्यातून उसळत येत जागोजागी वाट अडवणारी, रस्ता आपलासा करणारी भागा नदी आणि एका बाजूला खोल दरी असा मार्ग होता.
हिरवे-निळे पाचू सारखे लख्ख पाणी, त्याच्या चमचमणाऱ्या लाल-केशरी कडा असा सूरजताल तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला होता आणि त्याच्या काठावर डांबरी काळ्या रस्त्यावर अस्मादिकांची स्वारी भान हरपून विसावली. शुभ्र हिमाचा चमचमणारा मुकुट घातलेली काळी पर्वतशिखरे आणि त्या काळ्याच्या गडद चाॕकलेटी, तपकिरी अशा उताराकडे फिक्कट होत जाणाऱ्या रंगछटा, त्यावर मुक्त हस्तानी काढलेल्या धबधब्यांच्या पांढऱ्या रेषा, दरीत खोल पसरलेला हिरवा गालिचा असा दिसला बारालच्छा ला.
थोडा उतार संंपल्यावर विस्तीर्ण पठार त्याच्या दोहो बाजूला पर्वत, मधोमध चाललेला काळा रस्ता, रस्त्याच्या बाजूला हिरव्या कुरणांमध्ये चरणारे शेळ्या मेंढ्यांचे मोठाले कळप असे सारचू प्लेन आले. या सारचू प्लेनवर रस्त्याच्या मधोमध फोटो काढण्याची हौस पुरवून कँपकडे रवाना झालो.
सारचू ते व्हिस्की नाला (१३९०७) हे ४८ किमी चे अंतर कापताना २१ हेअरपिन वळणे असणारे घाटा लूप्स आणि नकीला पास (१५,५४७ फूट) हे टप्पे पार करायचे होते आणि हा या प्रवासातला अवघड टप्पा होता याची पूर्ण कल्पना होती. घाटा लूप्स सुरु झाल्यावर सुरूवातीला लूप्स मोजू लागले आणि ४-५ लूप्स झाल्यावर एक-एक छोटी विश्रांती घेऊ म्हणजे हे अंंतर सहज पार करता येईल अशी व्यूहरचना केली. सुरुवातीचे ४-५ लूप झाले आणि ठरल्या प्रमाणे दोन मिनिटे थांबून आणि दोन घोट पाणी पिऊन निघाले. वर ऊन तापत होते, आजू-बाजूनी जाणारी वाहने काळा धूर ओकत होती आणि शेवटी-शेवटी दोन हेअरपिन बेंडमधले अंतर वाढता-वाढता-वाढत चालले होते. 
१९ व्या वळणावर घाटा लूप्सची पछाडलेली जागा जिथे ट्रक बंद पडल्यामुळे  हिमवादळात सापडून त्या ट्रकमधील क्लिनरचा मृत्यू झाला होता व तिथेच नंतर त्याला पुरले गेले, ती जागा दिसली. तिथे  रस्त्याच्या कडेला बांधलेल्या एका दगडी चौथऱ्याच्या पुढ्यात प्रवाशांनी पाण्याच्या बाटल्या आणि सिगरेटी वाहून ढीग केला होता. या जागी काही प्रवाशांकडे एक तरुण माणूस येऊन अन्न पाणी वगैरेची मदत मागतो व तो त्या क्लिनरचे भूत आहे अशी दंतकथा आहे. कसे-बसे घाटा लूप्स संपले आणि आता काय नकीला येईलच मगच जेवू असा विचार करुन पौस्टिक खुराकाचे तोबरे भरुन पुढे-पुढे जात राहिले. पावणे चार वाजता नकीला पास येईपर्यंत नाकी नऊ आले. आणि इथे उत्साही मिथुनदानी दमदार अभिनंदन करुन सगळा थकवा घालवून टाकला आणि कडक मस्त गरमा-गरम चहा आणि बिस्किटांनी उत्साह दुणावला. 
नकीला पास नंतरचा सगळा उतार म्हणजे आॕफरोडिंग होते. माझ्या हर्षदासवे तिच्या नाजुक (हायब्रीड) प्रकृतीमुळे  आॕफरोडिंग करु शकत नाही. त्यामुळे दगड- गोट्यातून , खड्ड्यांमधून वगैरे सायकल चालवण्याची कधीच सवय नव्हती.  मनाली-लेहच्या माउंटन बाइकसवे ते करता आले, तिनी मला हात धरुन आॕफरोडिंग करायला शिकविले म्हणूनच तिचे मी 'ज्ञानदा' असे नामकरण मनातल्या मनात करुन टाकले.
व्हिस्की नाला ते पँग यांच्यामध्ये नकीलाच्या बरोबर वरच्या बाजूला असलेला लाचुंगला (१६४६२फूट) ओलांडायचा होता. आधी दोन्ही बाजूला असलेल्या राकट-दगडी डोंगररांगा आता भुसभुशीत माती-वाळू यांच्या झाल्या होत्या. सुरुवातीला ६-७ किमी चढून गेल्यावर लाचुंगला आला. नकीलाच्या तुलनेत हा फारच सुखद अनुभव होता. 


प्रत्येक वळणावर वेगवेगळे भूदृश्य दिसत होते. सायकल सुसाट चालली होती कारण सपाट रस्ता आणि उतार होता. इथे मनसोक्त फोटो काढूले. मग गप्पा गोष्टी करत नदीतीरावर डबे काढून जेवायला बसलो. जेवण पूर्ण संपायच्या आतच हिमवृष्टी सुरु झाली. भुरभुरणाऱ्या बर्फाचे अप्रुप वाटले   तरी ते लगेच गोठवून टाकते त्यामुळे लगेच निघावे लागले. नाही तर त्या नदीतीरी अजून काही घटका आनंदात गेल्या असत्या. 
पँग ते डेब्रिंग (१५०००फूट) हा प्रवास सोपा होता. इतक्या दिवसांनी मोरे प्लेन्सच्या सपाटीवर सायकल चालवायला फार मजा आली. स्वच्छ निळे आकाश, पांढऱ्या ढगांचे पुंजके, वाळूच्या लांबच-लांब पसरलेल्या डोंगररांगा-टेकड्या, त्यावर चाललेला ऊन-सावलीचा पाठशिवणीचा खेळ, दूरवर दिसणारे शेळ्या-मेंढ्यांचे मोठाले कळप हे सारे मोहून टाकत होते. ११.३०-१२ च्या दरम्यान जिथे पोहोचलो तिथून कँपसाइट. फक्त ४-५ किमी दूर होती. 
 रस्त्यावरुन काटकोनात वळण घेऊन १२ किमी कच्च्या वाटेवरुन त्सोकार लेककडे मार्गक्रमण सुरु केले. ऊन तापले होते, दूरवर कोणी दिसत नव्हते. आजूबाजूला चिटपाखरुही  नाही. मी एकटीच चालले होते. वाट खाबड-खुबड, चढ उताराची, चाके कधी वाळूत रुततील तर कधी वाळूत घसरुन आपटवतील याचा नेम नाही. मनात म्हटले आपण इकडे आपटलो तर कोणाला काही कळणारही नाही. असे पाऊणएक तास गेल्यावर १-२ सोबती सायकलस्वार दिसले आणि जरा जिवात जीव आला. 
त्सोकार लेक रुमशू दरीमध्ये ग्लेशिअरचे गोडे पाणी आणि वाळवंटी प्रदेशामुळे मीठ याचा २२ चौ कि.मी. क्षेत्रफळ असलेला ज्याच्या काठावर मीठच-मीठ पसरलेले आहे असा तलाव आहे. हे आर्द्रभूमी क्षेत्र जागतिक महत्त्वाच्या रामसर क्षेत्रांमध्ये  समाविष्ट असून समुद्र सपाटीपासून १५७६० फूट उंचीवर आहे. त्यामुळे इथे काही प्राण्यांच्या संकटग्रस्त प्रजाती तसेच स्थलांतरित पक्षी वगैरे आढळतात.पण वाट संपता संपेना आणि जस-जसे अधिक जवळ जाऊ तशी चाके वाळूत रुतल्यामुळे ढकलत न्यावी लागते हा अनुभव समजला.  
मग या तळ्याचे दुरुनच दर्शन घेतले आणि वाट फुटेल तिथून तिघे डांबरी रस्त्याच्या दिशेनी सायकल दामटवू लागलो. भुकेनी जीव कासावीस झाला होता. रस्त्याला लागल्यावर लगेच डबे उघडून ताव मारला आणि निघालो तर जोरदार वारा आणि पाऊस सुरु झाला. आमच्या विरुद्धदिशेनी वाहणाऱ्या उलट्या वाऱ्यामुळे कँपसाइटला पोहाचायला फारच वेळ लागला. हे त्सोकारचे साहस जरा जास्तच अंगलट आले.
डेब्रिंग ते रुमसे मध्ये प्रबळ टँगलांगला (१७५८२ फूट) ओलांडायचा होता. आज विशेष उत्साह होता कारण लेहच्या प्रवासातला हा शेवटचा आणि उंचीमध्ये २ नंबरचा पास होता. आज अगदी हलका नाश्ता केला. ताण न घेता मजेत जात राहिले की काही त्रास होत नाही. वाटेत अगदी योग्य अंतरावर चहाची सोय केलेली होती. टँगलांगला ला पोहोचल्यावर आनंदाला पारावार राहिला नाही. इथे एक दगडी बांधकाम आणि पांढरा स्तूप उभारलेला होता.
 
उतारावर वेगाने जाताना   हळुहळू हवा आणि प्रदेश बदलू लागला. थंड-बोचरे वारे आणि पाऊस सुरु झाला. नदी किनारी खूप छान वाटले. पाण्याचा स्पर्श मात्र गोठवणारा होता. आता तुरळक छोटी झुडुपे, फुले सुखद दर्शन देती झाली.

रुमसे ते लेह हा रस्ता आजपर्यंतच्या सगळ्या रस्त्यांमध्ये खास होता. इथे हिरवे गवत. रंगी-बेरंगी फुले, बागडणारे पक्षी होते.  खळाळणारी झंस्कार नदी होती. शुभ्र स्तूप मधूनच येणाऱ्या एखाद्या गावाची खूण सांगत गडद डोंगरांच्या उतारावर हारीने उभे होते. कुणी हिरव्यागार शेतात पाणी खेळवत होते. काही उंच मध्यम उंचीची झाडे शेतांची आणि घरांची राखण करत होती.  ही दृश्ये जागोजागी वाट अडवून मंत्रमुग्ध करत होती. 

इथे मातीचा रंगही बदलला होता. शुष्कपणा जाऊन ओलावा आला होता. बराच रस्ता सरळ होता, सायकल चालवण्यासाठी काही विशेष कष्ट पडत नव्हते. उपशीच्या पुलावर फोटो झाले आणि उपशीला दहा मिनिटे विसावा. आता रस्ते आणि ऊन्हे दोन्ही चढायला लागले. वाटेत जागोजागी सैन्याचे तळ आणि तपासणी थांबे लागत होते. सैन्याच्या वाहनांचा सगळीकडे वावर होता. सैन्यातली मराठी माणसे किंवा प्रवासी वगैरे सगळीकडे कुठून आलात, कुठे जाताय वगैरे कौतुकाने चौकशी करत होती.कारुला मस्त जेवण झाले. पुढे काही ठिकाणी झाडांच्या गर्द सावलीत मस्त थंड वाटत होते. 
युद्धांच्या, वीरांच्या आठवणी जपणारी संग्रहालये बघण्यासारखी होती. लेहजवळ एक राॕक अॕण्ड मिनरल म्युझियम दिसले. इथपर्यंत सारा परिसर अतिरम्य भासत होता. लेहच्या अलीकडे मात्र हे सारे शांत दृश्य बदलले. शहरी वाहतूक, आवाज, विरुद्ध दिशेनी येऊन वाट अडवायचा प्रयत्न करणारा खट्याळ वारा आणि रस्त्याचा बारीक चढ या सगळ्यांनी मिळून शेवटच्या टप्प्यात दम काढला, युथ होस्टेल, लेह येता येईना. पण इथे पोहोचल्यावर मात्र उत्तम व्यवस्था होती. 
                   शेवटच्या दिवशी पहाटे ४.३० ला खारदुंगला ला जाण्यासाठी आम्ही तयार झालो. लेह (११४८०फूट) ते खारदुंगला (१८०००फूट) हा या मोहीमेची परिपूर्ती करणारा जगातल्या  सर्वोच्च महामार्गावरील सर्वोच्च पासला नेणारा टप्पा होता आणि तो पूर्ण करण्यासाठी सारेच आसुसलो होतो. पण वरुणराजांची बरसात काही थांबत नव्हाती आणि आमच्या जाण्यावरच प्रश्नचिह्न लागले होते. पाऊस थांबल्याबरोबर सकाळी साडेसहाला कँपमधून निघून आगेकूच सुरु झाली. आता पहिले लक्ष्य साउथ पुलू वेळेत गाठणे हे होते. शक्यतो न थांबता जात राहणे इष्ट होते. २-३ छोटे थांबे घेऊन चांगला पल्ला गाठता आला. साउथ पुलूच्या ८ किमी आधी चहा-नाश्त्याची सोय अतिशय योग्य टप्प्यावर केलेली होती. साउथ पुलूला पाऊस सुरु झाला. पटापट विंड चीटर घालून पुढे जाणे सुरु ठेवले. पण काही अंतरानंतर मागे फिरण्याचा निरोप घेऊन वरुन परतणारे सोबती भेटू लागले. तरीही परतावे वाटेना, शक्य होईल तेवढं जावे...पण छे वर पावसाचे तांडव सुरु झाले आहे, काही जणांना थंडीने गारठल्यामुळे अँम्ब्युलन्समधून परत नेतायत सगळ्यांनी परत फिरायचे आहे असा निरोप पुन्हा-पुन्हा मिळाल्यावर नाईलाज झाला. परत फिरणे अगदी जिवावर आले असूनही आपल्याला त्रास होऊन व्यवस्थेवरचा ताण वाढवू नये असा सुज्ञ विचार करुन मागे फिरले. उतारावर जाताना जॕकेट वगैरेची आवश्यकता होती आणि ते सामान जीपमध्ये होते. जीपची वाट बघण्यात अर्थ नव्हता कारण पाऊस वाढला तर आश्रय घ्यायला कुठेही छप्पर नव्हते. मग ३५ किमी अंतर कापून थेट लेह कँपसाइटला पोहोचल्यावरच सायकल थांबली. खारदुंगला ला सायकलनी पोहोचण्यासाठी वरुणराजानी आडकाठी केली म्हणून खंत वाटली पण दुसऱ्या दिवशी नुब्रा व्हॕलीला जाताना जीपनी खारदुंगला ला जाता आले तेंव्हा मस्त वाटले.
              नुब्रा व्हॕली, डिस्किट माॕनेस्ट्री, कॕमल राइड, हुंदर गाव, पँगाँगचा चित्तथारारक प्रवास, पॕगाँग लेक, थिकसे माॕनेस्ट्री असे माफक स्थलदर्शन करुन विमानाने मुंबई गाठली आणि कधीही गुंगून जायला आवडतील अशा खुमासदार आठवणी वेचून या प्रवासाची सांगता केली.