एव्हरेस्टच्या दिशेने...
एव्हरेस्ट बेस कॅम्प साठी निघताना-
किशोरीनी मागच्या वर्षी ठरवलं; मला एव्हरेस्ट बेस कॅम्पला जायचंय. मग हळूहळू हा बेत आकार घेत गेला. माझा मन डळमळीत होतं कारण EBC ची उंची जवळपास अठरा हजार फूट आहे. आणि या आधी चार-पाच वेळा चौदा हजार फुटांवरच मला विरळ हवे मुळे हाय अल्टीट्युड सिकनेस चा त्रास झालेला होता. पण किशोरीकडे यावर रामबाण उपाय तयार होता, 'अगं काय घाबरतेस एक डाव्या बाजूला एक उजव्या बाजूला, रक्ताच्या बाटल्या घेऊन जायच्या, त्रास झाला की एकेक घोट घ्यायचा' अशी ही किशोरी. मीही म्हटलं मग, 'खरंच गं, ही भन्नाट कल्पना मला कधी सुचलीच नव्हती.' मी किशोरी, डॉ. राणा आणि अनंत हे चार भिडू नक्की झाले. ऋता, भास्कर, आदित्य आणि सतीश हे चार अजून जोडले गेले आणि मार्चमध्ये आमच्या एव्हरेस्ट बघण्याच्या स्वप्नाला विमानाचे पंखही मिळाले.
माझ्या लेकीला मी EBC ला जाणार आहे हे सांगण्याची ची सोय नव्हती. आईला चौदा हजार फूट उंचीवर त्रास होतो हे तिला पक्कं माहीत होतं. शिवाय आईची वीस दिवस घरातून रजा मंजूर होणे अशक्य होते. 'अगं तू कशी या वर्षात दोन वेळा एप्रिल आणि मे मध्ये ट्रेकसाठी जाऊन आलीस हिमालयात; मी सव्वा दोन वर्ष गेले नाहीये'- मी.' 'हो मग एप्रिल मध्ये माझ्या वाटणीची आणि मे मध्ये तुझ्या वाटणीची गेले मी"- माझी लेक; हा हिशोब अफलातून होता; माझेच दात माझ्यात घशात! मी गप्प. त्यानंतर सासऱ्यांचे गंभीर आजारपण उद्भवले आणि मी जाऊ शकेन की नाही असे प्रश्नचिन्ह उभे राहिले. त्यांनी या प्रश्नातून जीवघेणी सुटका केली. आता तयारी केली पाहिजे म्हणून पंधरा दिवस आधी रविवार पासून सकाळी सायकलिंग ला जायला सुरुवात केली. सोमवारी सकाळी मी किशोरी आणि अमेय तिघेजण ठाणे ते माटुंगा राइड करुन परत चाललो होतो. मुलंड फ्लाय ओव्हर च्या पंधरा-वीस फूट अलीकडे मी अचानक जोराचा धक्का लागून सायकल वरून खाली फेकली गेले; माझ्या उजवीकडच्या लेनमधून वेगात डावीकडे सर्विस रोडला जाणाऱ्या रिक्षावाल्याने मला मागून जोरदार धडक दिली. रिक्षा डावीकडे सर्विस रोड ला जाऊन पलटी झाली. त्याच्या मागचा बाईकस्वार अचानक ब्रेक दाबल्यामुळे स्लीप झाला आणि पडला. मला हाता-पायाला बरीच दुखापत झाली. पण त्याही अवस्थेत मी सायकल चालवत घरी जाऊ शकले. किशोरी घरी सोडायला आली. ट्रेक साठी ची रजा अजून मंजूर व्हायची होती. त्यामुळे ऑफिसला जाणे भाग होते. माझ्या जखमांवर आणि मारावर हळद, तुरटी आणि मिठाचा काशाच्या वाटीत केलेला कडकडीत गरम लेप किशोरीनी घरी येऊन लावून दिला आणि तिच्या या प्रेमामुळेच मला पटापट आराम पडला आणि मी हळू-हळू सामानाची जमवाजमव सुरू केली. निघण्याच्या चार-पाच दिवस आधी बहिणीचा फोन आला, आईची प्रकृती गंभीर आहे, ग्लोबल हॉस्पिटल ला अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. हातापायातले त्राणच गेले, काहीच सुचेना. पण देवाची कृपा की डॉक्टरांनी आईला मरणाच्या दाढेतून खेचून परत आणलं. तुम्ही निश्चिंत मनाने ट्रेकला जाऊन या असे मला सांगितले. एवढ्या अडचणी येऊनही आपल्याला ठरवल्याप्रमाणे जायला मिळते आहे....सॕक भरल्या. मी आणि किशोरी बुधवारी पहाटे विमानतळावर पोहोचलो. सगळेजण उत्साहात होते. काही जणांच्या पूर्ण बॕगा उपसून चेकिंग झाले. बूट तर सगळ्यांनाच काढायला लागले आणि बोर्डिंग पास घेऊन आम्ही गेट जवळ जाऊन बसलो. त्याआधी लाडू काजूकतली अशी गोड सुरुवात झालेली होती. विमानात बसून सगळेच डुलक्या घेऊ लागले. भुर्रकन् दिल्लीला पोहोचलो. आता काठमांडूच्या विमानासाठी बोर्डिंग पास घेण्याची लगबग सुरू झाली. आधीच्या अडचणी कमी होत्या की काय म्हणून माझ्यासाठी महानाट्य सुरू झाले. आमची आठ जणांची ओळखपत्रे एकत्र दाखवली. पण आंतरराष्ट्रीय विमानासाठी फक्त आधार कार्ड पुरेसे नव्हते. पारपत्र किंवा निवडणूक ओळखपत्र हवे तरच जाता येईल असे सांगितले. निवडणूक ओळखपत्राची प्रत घरी फोन करून मागवली. पण मूळ ओळखपत्र नसेल तर तुम्हाला जाता येणार नाही असे वारंवार उत्तर मिळाले. मग नाईलाज झाला. आणि मी सोडून सात जणांना काठमांडूच्या विमानासाठी निघावे लागले. तू कसेही करून उद्या ये, आपण सगळे उद्या एकत्र जाऊ, आम्ही तुझी वाट बघतोय, असे सांगून सगळ्यांनी माझा निरोप घेतला. त्यावेळची मनःस्थिती अत्यंत कठीण झाली होती. मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या एखाद्या प्रवाशा मार्फत निवडणूक ओळखपत्र मागवून घ्या, मी तुमचे तिकिट रिशेड्युल करून उद्याचे दिल्ली-काठमांडू तिकीट देते असा सल्ला इंडिगोच्या सौजन्यशील नेपाळी तरुणीनी दिला. मग श्रीकांतला म्हणजे माझ्या नवऱ्याला फोन केला. तो म्हणाला मुंबई विमानतळावर सगळ्यांना तुम्ही दिल्लीला जाताय का असा प्रश्न विचारत फिरू? ते शक्य नाही; त्याचेही खरे होते. काठमांडू ऐवजी दिल्ली-मुंबई असे तिकीट रिशेड्युल करून घरी परत जावे या निर्णयाप्रत मी आले. कारण इतक्या अडचणी येतायत म्हणजे पुढे येणाऱ्या एखाद्या संकटातून देव मला वाचवत असेल अशी विचारशृंखला सुरु झाली. घरी फोन करून सांगितले की मी आता परत येते. पण त्यावेळी श्रीकांतनी मला सांगितले की आता परत फिरू नकोस; मी तुला दिल्लीला ओळखपत्र आणून देतो किंवा तू मुंबईला येऊन घेऊन जा. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर बायकोला म्हणाला असता, आता मुकाट्याने घरी परत या. माझ्या मनाने पुन्हा उभारी धरली. आणि काय करता येईल याचा शांतपणाने मी विचार करू लागले बहिणीच्या नवऱ्याला,अमितला फोन केला. त्याने जरा विचार करून सांगितले की श्रीकांतला जेट कार्गोनी ओळख पत्र पाठवायला सांगतो म्हणजे आज रात्रीपर्यंत तुला मिळेल आणि उद्या तू जाऊ शकशील. हा नवीन नियम सुरू झाला आहे त्यामुळे आमच्या कंपनीतही तीन- चार जणांना असा त्रास झाला. झालं, ठरलं. पण दुसरं प्रश्नचिन्ह तयार होतं; दुसऱ्या दिवशीचा काठमांडू ते लुकला विमान प्रवास पुढे ढकलणे शक्य होईल का? मॅजिक हिमालयाजच्या नवीननी त्याचीही खात्री दिली. दुपारी साडेचार वाजता श्रीकांतनी कळवलं की कार्ड पाठवलंय, रात्री मिळेल. मग विमान तिकीट रिशेड्युल केलं जेट कार्गोची चौकशी करून फोन नंबर घेतला. आणि महिपालपूर मध्ये जाऊन हॉटेलची खोली घेतली. रात्री दीड वाजता जेव्हा ते कार्ड घेऊन परत आले तेव्हा जीवात जीव आला आणि शांत झोप लागली. सकाळची कामं आटपून दोन्ही सॕक पाठीवर घेऊन मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागले. वाटेत एक जण गरम समोसे तळत होता. गोड चटणीशी झणझणीत समोसा खाल्ला. पुढे चहाचे दुकान दिसले, आलं घालून गरम चहा कर म्हंटलं. आणि गरम चहाचे घोट घेताना तिकडे एक गृहस्थ आले. चहा चांगला आहे का याची चौकशी केली. गंमत म्हणजे ते गृहस्थ मुंबईचेच IIT इंजिनिअर होते. पवईला त्यांची स्वतःची कंपनी आहे. मलाही ट्रेकिंगची आवड आहे. तुम्ही पुन्हा कुठे जाणार असाल तर मला नक्की कळवा. त्यांनी कार्ड देऊ केलं. नंतर ओला बुक केली आणि मुख्य रस्त्यावर फ्लायओव्हर खाली पिकअप करायला सांगितले. विमानतळावरचे सगळे सोपस्कार पार पाडून जवळ पोहोचले आणि काठमांडूच्या विमानात बसले.
काठमांडूहून पुढे.....
किशोरीनी सांगण्याप्रमाणे इमिग्रेशन वर हॉटेल नेपालिया असे लिहिले होते. पण उतरल्यावर कुठे जायचे ते माहिती नव्हतं. घ्यायला नवीन येणार होता. काठमांडू विमानतळावरून बाहेर पडल्यावर त्याला शोधू लागले. नवीनला ओळखणार कसे हा प्रश्न होता. पण प्रोफाइल वरचा त्याचा फोटो बघितलेला होता. पाहुण्यांना घ्यायला आलेल्या सगळ्यांना फिरून बघून आले. पण कोणी ओळखीचे दिसेना. फोन बंद झालेला. पीसीओ सुद्धा कुठे दिसले नाहीत. आता काय करावे? पीसीओ कुठे आहे म्हणून चौकशी केली तर त्या भल्या माणसानी स्वतःच्या मोबाईलवरून नवीन ला फोन लावून दिला. समजले की नवीन ला ट्रॅफिक मुळे उशीर होत आहे. आता शांतपणाने वाट बघण्याशिवाय पर्याय नव्हता. अर्ध्या तासानी नवीन आला आणि त्याने मला बरोबर ओळखले म्हणून बरे कारण मी बघितलेल्या त्याच्या प्रोफाइल फोटो वर बरेच व्याज चढलेले होते. नेपाळमध्ये एक बरं आहे भाषेची अडचण नाही. हिंदी भाषा सगळ्यांना कळते; बाॕलिवुडची किमया! हॉटेल नेपालिया त्रितारांकित होते. अंतर्गत सजावट सुंदर होती. पायनॕपल ज्युसनी स्वागत झाले. खोली सहाव्या मजल्यावर मिळाली. पण उद्वाहन बंद असल्यामुळे इथेच ट्रेकची सुरुवात झाली. WiFi वरुन संपर्क साधून मी सुखरूप काठमांडूला पोहोचल्याचे घरी कळवले. थोडा वेळ आराम करुन मग रुफटॉप रेस्टोमध्ये चहा प्यायला गेले. तिथे बाजूच्या टेबलवर जर्मन पिता-पुत्री आणि त्यांचा गाइड बसले होते. त्यांच्या बोलण्यावरुन तेही उद्या सकाळीच लुकलासाठी निघून EBC ला जाणार आहेत असा अर्थबोध झाला. पहाटे पावणेपाचला हाॕटेल नेपालियामधून गाडी विमानतळाकडे निघाली. मला घ्यायला नवीन आणि सहाय्यक गाईड केशव दोघेही आले होते. केशव माझ्याबरोबर लुकलाला येणार होता. काठमांडू आकाशवाणीवर मंगल प्रभाती संस्कृत स्तोत्र तालासुरात गायले जात होते. ते ऐकून अतिशय प्रसन्न वाटलं. सामानाचे वजन मर्यादित ठेवण्याबद्दल आमच्या अनुभवी लोकांनी आधीच बजावले होते. त्यामुळे त्यावरून काही कटकट झाली नाही. लुकलाची धावपट्टी खूप छोटी आहे. तिथे फक्त पंधरा आसनी विमाने उतरू शकतात. त्यामुळे पंधरा किलो वजनाची मर्यादा प्रत्येक प्रवाशाला पाळावी लागते. तिथे विमान उतरवणे खूप कौशल्याचे काम आहे. हवामान खराब झाले तर विमान निघेल याची खात्री नसते. त्यामुळे एखादा दिवस जास्तीचा ठेवावा लागतो. सुदैवाने मला दुसऱ्या ऐवजी पहिल्याच विमानातून जाता आले. विमानातून दिसणारे दृश्य अनिमिष नेत्रांनी बघताना कॕमेरॕमध्येही टिपू लागले. मला हॉटेलमधून दिलेला नाश्ता हातात तसाच राहिला. पंचवीस मिनिटात लुकला आले. भुरु-भुरु पाऊस पडत होता. त्यामुळे नाईलाजानी कॕमेरा आत टाकावा लागला.एक चढ चढून गेल्यावर याक हॉटेल आले. सकाळी साडे-सहाला सगळ्यांना सुप्रभात करायला मी पोहोचले होते. मला भेटून प्रत्येकाची स्वतंत्रपणे हीच प्रतिक्रिया होती की मी दिल्लीहूनच परतीचे विमान पकडले असते. दोन दिवस ताटातूट झाल्यानंतर पुन्हा सगळा चमू भेटण्याचे खूप अप्रूप वाटले. एकत्र नाश्ता करताना मनात विचार आला की काही माणसांना एकट्याने प्रवास करण्यातही आनंद घेता येतो, आपणही तसा आनंद घ्यायला शिकले पाहिजे. थंड हवा आणि भुरभुरणारा पाऊस, सुरुवात तर छान झाली, फकडिंग कडे निघालो. लुकलाच्या वेशीवर एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या नेपाळी महिलेचे स्मारक लागले. पुढे गेल्यावर मंजुळा, प्रमोद आणि दीपक भेटले. मंजुळा आणि प्रमोद मुंबईचे तर दीपक बंगलोरचा होता. समाज माध्यमांमार्फत एकमेकांशी संपर्क साधून तिघे एकत्र EBC साठी निघाले होते. लुकला ते फकडिंग हे अंतर तसे फार नव्हते. पण उतार आणि चढ होते. लुकला आणि फकडिंग ही दोन्ही गावे साधारण एकाच उंचीवर ( अंदाजे ८८०० फूट ) आहेत. लुकला ची वेस ओलांडताना परवानगी घ्यावी लागते. ते सोपस्कार अर्थात आमच्या गाईडने म्हणजे शांतानी पार पाडले. पुढे जंगल सुरु झाले. बोलता-बोलता मंजू चा ट्रेकिंग पोल हातातून सटकला. आणि उतारावरून खाली गेला. केशवने तो पटकन खाली उतरून काढून दिला. आता रस्त्याकडे नीट लक्ष द्या असा जणू तो इशारा होता.
EBC ला जायला बरेच परदेशी लोक येतात आणि विशेष म्हणजे सगळे परदेशी लोक आपण भारतीय दिसलो की रीतसर हात जोडून 'नमस्ते' करतात. त्यामुळे या प्रवासात आम्हालाही ही छान सवय लागली; वाटेत, गावात कुणी भेटले की हसून आणि हात जोडून 'नमस्ते" करायचे. आपली भाषा ही इथे सगळ्यांना कळते. काही जण EBC कडे जात होते तर काहीजण एव्हरेस्टचे दर्शन घेऊन परत येत होते. येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान वाचता येत होते. 'How was it?' प्रश्नाला 'Very tough' हे उत्तर मिळाल्यावर जाणार्यांच्या जीवाची धडधड वाढत होती. आणि आजूबाजूचा रम्य परिसर मनावरचा ताण सैल करत होता. शुद्ध हवा भरून घेत डोंगरांच्या कुशीत जाताना ताजेतवाने होत होतो. ट्रेकचा पहिलाच दिवस असल्यामुळे उत्साह ओसंडून वाहत होता. अधून- मधून थर्मास मधले गरम पाणी पिणे सुरू होते. फकडिंगचा मुक्काम ट्रेकर्स लॉजमध्ये होता. वाटेवरती वळणे घेत जाणाऱ्या दूधकोषी नदीची सोबत होती. आणि ठिकठिकाणी नदीवरच्या झुलत्या पुलांनी दोन-तीर जोडले होते. या पुलांवर चालण्याची कसरत जमली की मजा येते. अनंत आणि सतीश सरांना जुनी आठवण आली. मागच्या वेळी आलो होतो तेव्हा हा रस्ता खचला होता. त्यावेळी खोल उतरून पुन्हा तेवढेच चढावे लागले होते, वाटही दुर्गम झाली होती. फोटोग्राफी पाऊस आणि पूल यांचा आनंद घेत मजेत मार्गक्रमण चालले होते. इथेही परसात आणि रानात रंगीबेरंगी फुले फुलली होती. नजर मात्र मनालीच्या ट्रेक मध्ये दिसणारे रंगीबेरंगी टवटवीत गुलाब शोधत होती. जेवणासाठी मुक्कामी पोहोचलो. नेपाळी थाळी सेटमध्ये भात, राईची पालेभाजी, फ्लॉवर बटाटा भाजी, पापड, लोणचे, मटकीची पातळ डाळ असे पदार्थ होते. लोणचे, डाळ, भाजी सगळेच पदार्थ बनवण्याची पद्धत वेगळी. सगळे पदार्थ सौम्य चवीचे; तिखट-मसाला आणि शिजवणेही बेताचे. फ्लॉवरच्या फोडीही मोठ्या-मोठ्या. कदाचित हवेचा दाब कमी असल्यामुळे पदार्थ लवकर शिजत नसतील. प्रत्येक नवीन चवीची सवय करून घ्यावी लागते, 'अन्न हे पूर्णब्रह्म' म्हणून समाधानाने थाळी संपवली. हवेमुळे पदार्थ थंडही लवकर होतात. इथे जेवणानंतर चहा पिण्याची पद्धत आहे. चहा बनवण्याची पद्धतही वेगळीच. चहा पावडर नावालाच. कोणी ग्रीन टी, कोण लेमन टी, कोणी जिंजर टी घ्यायचे. साखर टेबलवर ठेवलेली असते, हवी तर टाकून घ्या. मी मात्र दूध चाय घेणे पसंत करत होते. जेवण झाल्यावर फिरायला निघालो. दूरवर नदीवरचा पूल होता, त्या दिशेने आम्ही निघालो. वाटेत एक गाईड भेटला. तो एका अमेरिकन मुलीला EBC ला घेऊन जात होता. खूप बडबड्या होता तो आणि चीनी कसे, अमेरिकन कसे, युरोपीयन कसे, भारतीय कसे इत्यादी वर्णन करत होता. भारतीय लोकांचं सगळं चांगलं असतं फक्त बडबड मात्र फार करतात, असे त्याचे मत पडले, असो. मी फिरायला जाताना बूट घालायचा कंटाळा केला. त्यामुळे वाट अरुंद आणि चिखलाची झाल्यावर परत फिरले. भास्कर, आदित्य, राणा सरही परत फिरलेले दिसले. मग संध्याकाळी चार वाजता दूध चाय आणि नंतर मेंढीकोट; एका कॅटमध्ये आठ जण असा मेंढीकोट प्रथमच खेळले. कोणकोण पार्टनर ते लक्षात ठेवताना मजा यायची. आणि नाही लक्षात राहिलं की कच्चा लिंबू पान उचलून घ्यायचे, मग त्यावरून थट्टा-मस्करी असं सुरू असतानाच रात्रीचं जेवण यायचं रात्रीच्या जेवणाच्या आधी महत्त्वाचं काम म्हणजे नाश्त्याची ऑर्डर देणे. इथे सगळ्या हॉटेल्स मधला मेनू एक सारखा असायचा. तो इतका तोंडपाठ झाला की झोपेत कोणी विचारलं तरी सांगता यावा. सगळे जण सुरुवातीला सनी साईड अप वर असायचे. हा हाफ फ्राय सारखा प्रकार असतो. मी कधी मुसळी तर कधी कॉर्न फ्लेक्स आणि कधी कधी मग व्हेज सॅंडविच घ्यायचे कारण आमच्या शाकाहारामध्ये पांढरे बटाटे देखील बसत नाहीत. रात्रीचे जेवण संपायच्या आधीच फलाहार म्हणजे नाजूक-पातळ फोडी केलेले सफरचंद दोन प्लेट भरून हजर असायचे. मग आमची मेंढीकोट ची खेळी अजून लांबत असे. एकीकडे व्हाट्सअप कॉल करून एकमेकांच्या घरच्यांशी गप्पा व्हायच्या. इथे प्रत्येक हॉटेलमध्ये वाय-फायची सुविधा उपलब्ध असते. मात्र त्यासाठी अधिक आकार भरावा लागतो. खेळताना वज्रासन घालून बसणे, झोपताना गायत्री मंत्र म्हणणे हे माझे आणि किशोरीचे नित्याचे कार्यक्रम असत. सतीश सर आणि किशोरी रोज पहाटे नियमित ध्यानाला बसत. सुरुवातीला माझ्यासारखे काही उत्साही सदस्यही ध्यानाला बसण्याचा पराकोटीचा प्रयत्न करत.मात्र निद्रादेवीचे ध्यानच अधिक सोयीस्कर असल्याचे लक्षात आले. स्वक्षमता वाढविण्यासाठी ध्यान नाही परंतु झोपण्यापूर्वी स्वयंसूचना देणे मात्र नित्य सुरू होते. आणि त्याचा निश्चित उपयोग होईल असा दृढ विश्वास होता.
ट्रेक च्या दुसऱ्या दिवशी फकडिंगहून (८८०० फूट) नामचे बाजार (जवळपास११५०० फूट) म्हणजे बरीच उंची गाठायची होती. नामचे बाजारची चढाई खडी आहे. सकाळी लवकर निघून सर्वांनीच वेग चांगला राखला होता. आदित्य आमच्यातला सर्वात तरुण आणि तगडा गडी होता; उत्साहाने सळसळणारा. त्याचे प्रत्येक पाऊल सहज आणि दमदार असायचे. वयानी लहान आणि स्वभावाने खेळकर असल्यामुळे तो आम्हा सगळ्यांचा लाडका होता. त्याची आणि त्याच्या काकाची म्हणजे भास्करची जोडगोळी असायची. चालता-चालता गप्पांमधून ऋता, सतीश,भास्कर आणि आदित्य यांच्याशी परिचय होत होता आणि आवडीनिवडी समजत होत्या. नामचे ला जाताना टोकटोक, बेंकार, जोरसल्ले इ. गावे लागली; सगळी डोंगरात वसलेली. प्रत्येकाच्या परसात मोठ-मोठे कोबी,सफरचंद, डाळिंबाची झाडे होती. इथे लाल-चुटुक कणसासारखे फळ बऱ्याच ठिकाणी दिसत होते. ते फार मनमोहक होते. बटाट्याची शेती होती आणि बटाट्याच्या फोडी करून वाळवून ठेवतात. नामचेला जाताना वाटेतल्या सागरमाथा चेक पोस्टवर बराच वेळ थांबलो होतो. तिथे पुन्हा मंजू, दीपक आणि प्रमोद भेटले. तिथे थांबलेल्या एका फॉरेनरची मिशी आवडली म्हणून त्याच्या बरोबर आदित्य आणि भास्करनी फोटो काढले. एका जागी थांबल्यावर थंडी वाजायला लागली. मग लिंगमुद्रा उपयोगी आली. दोन-तीन मिनिटे लिंगमुद्रा केल्यावर थंडी छूमंतर होऊन जाते. थोडीसी पेटपूजा पण झाली. ऋतानी खूप छान लाडू बनवून आणले होते. माझाही रक्त वाढीसाठी सहा महिन्यांपासून सुरू केलेला खजूर कच्चे शेंगदाणे आणि गूळ यांच्या लाडवाचा खुराक चालू होता. (इतकं करूनही जायच्या आधी हिमोग्लोबिनचे प्रमाण फक्त ९.२ होते तो भाग वेगळा) नदीतीरावर पूल ओलांडून गेल्यावर एका रम्य स्थळी आम्ही जेवणासाठी थांबलो. दूरवर पहाडी भरल चरताना दिसत होत्या. त्यांचे फोटो सेशन झाले. भरपेट जेवून आता नामचेचा चढ चढायचा होता. सगळ्यांची पावले साहाजिकच मंदावली होती. माझी चालण्याची संथ गती मात्र कायम होती. बरोबर गाईड शांता होता. मला सांगत होता, 'आपके ग्रुप के सभी लोग आगे भाग रहे हैं'' मी मनात म्हंटलं ठीकच आहे, आपण आपल्या गतीने जाऊ. शांता लाही हिंदी बऱ्यापैकी समजत होते. पण हिंदी सिनेमे बघत नसल्यामुळे तो पारंगत नव्हता. त्याने त्याच्या बायकोचे आणि वहिनीचे सणाचे फोटो दाखवले. सुवासिनी लाल पेहराव करून हरितालिकेचे व्रत करत होत्या. शांता मला सांगत होता, 'बिस्तारी-बिस्तारी चालो'; बिस्तारी-बिस्तारी म्हणजे धीरे-धीरे, होले-होले. बरोबर पावणे तीन वाजता मी आणि शांता नामचचे बाजार चेक पोस्ट ला पोहोचलो. मी शांताला विचारलं, 'किधर हैं ग्रुप के आगे भागे हुए लोग?' 'नही कोई नही है हम हीआ गये हैं' 'मुझे तो पता था कि कोई आगे नहीं गया है. लेकिन मेरे दोस्त इतने कमीने हैं कि कहेंगे तुम कहा थी? हम तो तुम्हे ढूंढ रहे थे.' सव्वा तीन वाजता आदित्य येऊन पोहोचला आणि पाठोपाठ अनंत आणि राणा सरही आले. ऋताआल्यावर तिला चॉकलेट भरवले. मग सतीश सर आले. आणि शेवटी माझी सखी किशोरी ही आली. आल्यानंतर मला सगळ्यांनी खट्याळपणे, हेच विचारले, तू कुठे होतीस आम्ही तुला शोधत होतो. एकमेकांची अशी चेष्टा मस्करी केल्यावर चढ चढल्याचे श्रम विसरायला झाले. आपल्याकडे घाटात देवळे असतात तशा इथेही छोट्या मॉनेस्ट्री चढावर असतात. ते आपण गोल फिरवायचे त्यातून घंटेचा किण-किण आवाज येतो. 'Rotate this to purify your soul.' नामचे बाजारच्या कमानीतून प्रवेश केला. सगळ्या गावांच्या कमानी मध्ये सुंदर चित्रे रंगविलेली असतात. नाजूक नक्षीकामही होते. नामचे बाजार मध्ये पायऱ्यांवरून पाणी सोडून कारंजी वगैरे सुशोभन केलेले आहे. EBC च्या मार्गातला नामचे बाजार हा महत्त्वाचा टप्पा सगळ्यांनी हसत-खेळत गाठला होता. इथल्या हॉटेलमधील खोल्या बर्यापैकी प्रशस्त होत्या. मी आणि किशोरी नी पोहोचल्यावर खोलीमध्ये स्ट्रेचिंग करून सूर्यनमस्कार घातले. ऋताची मान दुखत होती म्हणून तिनेही व्यायाम केले. मग गाणी-गोष्टी-गप्पा आणि चहा झाल्यावर मी, किशोरी आणि आदित्य किरकोळ खरेदीला आणि नामचे चा बाजार फिरायला बाहेर पडलो. पुढचा दिवस हवामानाची सवय होण्यासाठी मोकळा होता. सकाळी टेकडीवर फिरायला गेलो. विविधरंगी रानफुले फुलली होती. टेकडीच्या माथ्यावर हेलिपॅड आहे. वरच्या हॉटेल मध्ये चहा घेतला. नामचे बाजार गाव बरेच पसरलेले आहे. एका ठिकाणी रंगीत तंबू ओळीत लावले होते. जेवणापर्यंत परत आलो. आणि जेवण झाल्यावर पुन्हा फिरायला बाहेर पडलो. टोप्या, पोंचो इत्यादी बरीच खरेदी झाली मग मुक्काम नामचे बेकरी मध्ये; केक आणि चहा. माझा ट्रेकिंग पोल उघडत नव्हता. तो त्यांच्या हत्यारांनी उघडून त्याची बूचे बसवून देणारे दुकानदार काकाही ट्रेकर होते.
नामचे ते टेंगबोचे हा ११५०० फूट ते १२९०० फूट असा पल्ला गाठायचा होता. सकाळी लवकर निघालो. पहिला चढ कधी चढून आलो ते हिमशिखरे दिसल्यावर कळले. लोत्से आणि एव्हरेस्ट बर्फ पांघरून चमचमत होती. आणि उजव्या बाजूला आमाडबलम विविध वळणांवर दर्शन देत होते. हवामान अनुकूल असल्यामुळे हे विलोभनीय दर्शन झाले आणि त्यासाठीच सकाळी लवकर निघण्याचा कटाक्ष पाळला होता. या सुंदर वळणावर किती आणि कसा वेळ गेला ते कळलेच नाही. मनसोक्त फोटो काढून पुढे निघालो. वाटेत पेंगबोचेला जेवण आणि चहा झाला. टेंगबोचेलाही प्रवेशद्वार आणि कमान बघितली. आत प्रवेश केल्यावर भगवी वस्त्रे परिधान केलेले माँक दिसले. त्यांना नमस्कार करुन आशीर्वाद घेतला. खोल्यांमध्ये सामान ठेवून लवकर माॕनेस्ट्रीला जायला निघालो. माॕनेस्ट्रीच्या आवारात प्रवेश मिळाला, आवार बघितले पण माॕनेस्ट्री बंद झाली होती. रात्री नेहमीप्रमाणे फोनवर गप्पा आणि मेंढीकोटचे डाव रंगात आले होते. हाॕटेलचे मेन्यू पाठ झाले होते. आणि कोण काय घेतंय याचा अंदाज घेऊन सगळे जण जेवणाची आणि नाश्त्याची अॉर्डर देत असू. कोण-कोण काय-काय घेतंय हे बघण्याचे कारण म्हणजे आपल्याला त्याप्रमाणे वाटून खाता यावे. एकच पदार्थ सगळ्यांनी घेण्यापेक्षा वेगवेगळे पदार्थ असावे. आता भास्करला विरळ हवेमुळे डोकेदुखीचा त्रास सुरु झाला होता. आदित्य आणि भास्कर दोघांनाही जेवण नीट जात नव्हते. ऋताला नामचेला पोट बिघडल्यामुळे थोडा त्रास झाला. पण नंतर औषध घेतल्यानंतर ती ठीक झाली. राणा सर, सतीश सर, अनंत सर आणि ऋता यांनी यापूर्वीही अतीउंचीवरच्या मोहिमा केल्या होत्या त्यामुळे त्यांना हवामानाशी कसे जुळवून घ्यावे, काय त्रास होऊ शकतो याची माहिती व अनुभव होता. अति उंचीवर विरळ हवेमुळे डोके दुखणे, उलट्या होणे, पोट बिघडणे श्वास घ्यायला त्रास होणे, भूक न लागणे, असे त्रास होऊ शकतात हळूहळू शरीराला हवामानाची सवय होते आणि त्रास कमी होतो. परंतु तसे न झाल्यास खाली उतरून जाणे हाच पर्याय असतो. अन्यथा गंभीर आजार होऊन जीव दगावू शकतो. यासाठी ऐनवेळी काही औषधयोजना होऊ शकत नाही. पण आधीपासून प्राणायाम वगैरे केल्यास व औषधे घेतल्यास नक्कीच उपयोग होतो. आदित्यच्या शिरस्त्याप्रमाणे आजही बेकरीला भेट दिली.
टेंगबोचे (१२९०० फूट) ते डिंगबोचे (१४५०० फूट) असा प्रवास होता. उंचीत फार फरक नसला तरी बरेच अंतर उतरून मग पुन्हा चढावे लागले. असे चढ-उतार आनंदाने पार करत गेले की आयुष्यातले चढ उतार पचवण्याचीही जास्त शक्ती येते. हीच शक्ती, हीच उर्जा कमवायला ट्रेकला जायचं असते. हा रस्ताही नयनरम्य होता. डोंगर उतारावर रंगीबेरंगी रानफुले डोलत होती. आणि डोंगरात फुललेल्या फुलांनी आणि प्रकाशाच्या छटांनी या डोंगरालाही आपल्या रंगात माखले होते. जसजसे उंचावर जावे तशी थंडी वाढत होती. पण चालत असताना ते जाणवत नव्हते. कुठे थांबले तर मात्र थंडी वाजत असे. मग अशावेळी लिंगमुद्रा करायची थंडी दोन-चार मिनिटात छू होते. कोण पुढे कोण मागे याचा विचार न करता सगळेजण आपल्याच मस्तीत चालत असत. आज लंचला नेपाळी शेरपा थुकपा होता. हा नूडल्स आणि भाज्या घालून केलेला सरसरीत प्रकार असतो आणि त्याबरोबर पोळी खायला देतात. नंतर त्यावर चहा. आज कोणाला जास्त जेवण जात नव्हते. थोडेतरी खायलाच पाहिजे म्हणून एकमेकांची समजूत घालून खायला लावले. वाटेत तहान लागली तर फक्त गरम पाणीच फक्त प्यायचे हा नियम मात्र मी आणि किशोरीनी कटाक्षानी पाळला होता. याचा थंडीसाठी फार उपयोग होतो. डोंगर उतारावर अनेक छोटी-छोटी खेडी वसलेली आहेत. देशी-विदेशी अनेक पर्यटक इथे एव्हरेस्टच्या दर्शनासाठी येत जात असतात. या सगळ्यांची सोय करणे हा इथल्या लोकांचा मुख्य व्यवसाय; त्यावरच त्यांची उपजीविका चालते. पण सगळे लोक आनंदी आणि उत्साही, कधीच कुठे भांडण-तंटा दिसला नाही. डिंगबोचेला एक दिवस विश्रांती घेण्याऐवजी एक पाऊल पुढे थुकलला जाऊन थांबण्याचे ठरले. थुकलाची उंची १५३०० फूट आणि रस्ता चढणीचा होता. वरवर जावे तशी झाडांची उंची कमी होत जाते. उंच झाडांची जागा आता बेताची उंची असलेल्या झुडुपांनी घेतली होती. खोल वाहणारी दूधकोषी नदी जवळ येत होती. तिचे पात्र रुंदावत चालले होते.थुकलाच्या जवळ लवकरच पोहोचलो. नदीच्या पात्रात गुळगुळीत दगड गोटे आणि वाळू पसरली होती. एक छोटासा पूल पार करून थुकला मध्ये प्रवेश केला. जेवणानंतर सगळे जरा सुस्तावले. पण मी, किशोरी आणि सतीश सर मात्र फिरायला बाहेर पडलो. गप्पागोष्टींमध्ये रामायण-महाभारत त्यातील पात्रे आणि उपकथानके असे बरेच काही विषय निघाले. प्रत्येक माणसाचे जगण्याचे एक स्वतंत्र तत्त्वज्ञान असते; अशा गप्पांमधूनच एकमेकांची ओळख होत असते. १४००० फुटांचा टप्पा लीलया पार केल्यानंतर विशेष आनंद झाला होता. पूर्वीसारखा विरळ हवेचा काही त्रास झाला नाही. आता मी त्रास होऊ नये म्हणून घेत असलेल्या कोका या होमिओपॅथिक गोळ्यांच्या परिणामाबद्दल विश्वास वाटू लागला. आणि यानंतर काही त्रास होणार नाही याची खात्री वाटली, स्वयंसूचना देणे सुरू होतेच.
थुकला ते लोबुचे ही १५३०० फूट ते १६५०० फूट चढाई होती. थंडीचा कडाका वाढत होता. पण decathlon चे फ्लीस चांगली ऊब देत होते. लोबुचेचा मुक्काम ऑक्सिजन अल्टिट्यूड मध्ये होता. इथे हॉटेलमध्ये सगळीकडे नेपाळ मधील प्रसिद्ध सोनम फोटोग्राफर यांनी काढलेले हिमशिखरांचे फोटो लावलेले होते. वाटेनी जाताना आणि पोहोचल्यावर लोत्से हे हिमशिखर सोबत करीत होते. लोबुचे पर्वत आणि थांगशेरकू शिखरही दिमाखात उभे होते. असे हे पर्वतशिखरांनी वेढलेले गाव थंडगार होते. जेवणानंतर लगेच आम्ही सगळे फिरायला बाहेर पडलो. जगातील सर्वात उंच बेकरी इथे होती. इथे मांडून ठेवलेली वाद्ये आम्हाला खुणावू लागली. किशोरीनी व्हायोलीनवर छानशी धून वाजवली. हौशी लोकांनी फोटो काढले आणि मग केकचा आस्वाद घेतला. नंतर जरा फिरावे म्हणून एक टेकडी ओलांडून पलीकडे गेलो. तर तिथे तंबू लावलेले होते. त्या कँपमध्ये आम्हाला ६५ वर्षांच्या लेडी लिडीया भेटल्या. त्यांनी वीस वर्षांपूर्वी एव्हरेस्ट शिखर प्राणवायूची मदत न घेता सर केले होते. जगातली एव्हरेस्ट सर करणारी पहिली अपंग भारतीय महिला अरुणिमा लिडिया यांच्या चमू बरोबरच एव्हरेस्ट मोहिमेला गेली होती. ही भेट काही आगळाच आनंद देणारी होती. त्यांच्या सोबत फोटोही काढले.
लोबुचे ते गोरक्षेप (१६५०० ते १७२०० फूट ) ही चढण कस बघणारी होती. पहाटे सहा वाजता निघालो. बाजूला खुंबू ग्लेशियर होते. डिंगबोचेला आमचा गाईड शांता आजारी पडल्यामुळे खाली उतरून फेरीचकडे गेला होता. एक पोर्टर संतोषही आजारी पडला आणि परत गेला. काली पोर्टर आणि गाईड दोघांची कामे पार पाडण्याची कसरत करत होता. बरोबर घेतलेली औषधे या सगळ्यांच्या उपयोगी आली. गोरक्षेपला पोहोचायला सव्वा अकरा वाजले. इथे शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. शिवाजी महाराजांचे हे स्मारक पुण्याच्या गिरिप्रेमी या ट्रेकर्स मंडळींनी बांधले आहे. ते बघून ऊर अभिमानाने फुलून आला. प्रथम महाराजांचे दर्शन घेऊन मगच हॉटेल कडे गेलो. इथे पोहोचेपर्यंत खूपच दमछाक झाली होती. मला थकल्यासारखे वाटत होते. आदित्यला उलट्या आणि डोकेदुखीचा प्रचंड त्रास सुरु झाला; त्यामुळे 'मी आता EBC ला येत नाही असे त्यानी सांगून टाकले.' आम्ही फक्त सूप पिऊन EBC ला जायला निघालो. माझ्याकडे बघून मी एवढे अंतर चालू शकेन असे कोणालाच वाटत नव्हते. पण माझा निश्चय होता आणि मनही सांगत होते की तू जाणार आहेस. बिस्तारी-बिस्तारी चालत राहिलो. बरेच जण परतीच्या वाटेवर होते. या वाटेवरही अनेक चढ-उतार होते. १७९०० फूट उंची गाठायाची होती. किशोरी आणि राणासर दोघेही माझ्याबरोबर सावकाश येत होते. वाटेत मध्ये-मध्ये दम खाऊन पुढे निघत होतो. हातात फक्त ट्रेकिंग पोल होता. माझ्या सोबत्यांचा खूपच आधार वाटत होता. हवा स्वच्छ होती. एव्हरेस्ट नजरेच्या आवाक्यात आले होते. एव्हरेस्ट बेस कॅम्पच्या पाटीजवळ उभे राहून सगळ्यांनी फोटो काढले. एव्हरेस्ट शिखर डोळ्यांमध्ये साठवत हळू-हळू पुढे चालू लागलो. 'इथे पूर्वी एव्हरेस्ट बेस कॅम्प लागत असे' - अनंतनी सांगितले. ते एका दगडावर बसून शिखर न्याहाळत होते. खाली पठारावर फक्त एक पिवळा तंबू लागलेला दिसत होता. कारण सप्टेंबर महिन्यामध्ये एव्हरेस्टच्या मोहिमा नसतात. चार वाजले होते. आता त्या तंबूपर्यंत जाऊन यायला फार उशीर होईल त्यामुळे इथूनच परत फिरुया असा निर्णय सर्वांनी मिळून घेतला. नेत्रांच्या ज्योतींनी त्या उत्तुंग गिरीशिखरला ओवाळून मन तृप्त झाले. एव्हरेस्ट जवळून बघण्याचे स्वप्न पूर्ण झाले. ते अत्युच्च हिमशिखर आता कायम खुणावत राहील, माझ्याकडे ये म्हणून बोलावत राहील. पण आता मात्र परत फिरणे भाग होते. सूर्य कलत गेला की हवामान बिघडते आणि हिमवादळाचा धोका असतो. आम्ही परत फिरताना पुन्हा मंजुळा भेटली. ती एकटीच होती. प्रमोद मागे होता आणि दीपक पुढे गेला होता. एकमेकांच्या गतीशी जुळवून घेणे खरच अवघड काम; ट्रेकमध्ये आणि आयुष्यातही.
गोरक्षेपला आम्ही सगळे एकत्र पोहोचलो. तिकडे एकत्र फोटोही काढले. हॉटेलवर परत गेलो तर आदित्य साधारण ठीक दिसत होता. त्याला दुपारी डॉक्टरांनी २-३ लिटर पाणी पिऊन पंधरा मिनिटे चालून यायला सांगितले. त्यानंतर त्याची ४५ झालेली ऑक्सिजनची पातळी वाढून ७० पर्यंत गेली. पण त्याला जेवण काही गेले नव्हते चहा आणि कुकीज येईपर्यंत आम्ही सगळ्यांनी आमचीही ऑक्सिजनची पातळी तपासून बघितली. त्या रात्री आदित्य फारच अस्वस्थ होता. त्यामुळे गोकियो री आणि चोला पासचा बेत रद्द करून सगळ्यांनीच खाली उतरावे असा निर्णय घेतला. कारण पोर्टर आणि गाईड कमी असल्यामुळे दोन ग्रुप करणे शक्य नव्हते.
गोरक्षेपला सकाळी एव्हरेस्ट आणि शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरु झाला. प्रत्येक कॅम्प मध्ये मोबाइल आणि कॅमेरा यांच्या बॅटरी चार्जिंग साठी वेगळा आकार घेतला जातो. जसजसे वर जावे तसतसा हा आकार तसेच वस्तूंच्या किमती वाढत जातात. इथे सगळीकडे वायफाय सुविधा तसेच गरम पाणी यांचाही लाभ मिळू शकतो; हे सारे विशेषच आहे. कारण येथील सर्व सामानाची वाहतूक घोड्यांवर अथवा याकवर लादून केली जाते. हे असे कळप आले की चालणा-यांचीही धांदल उडते. एका बाजूला (शक्यतो दरीची बाजू टाळून) उंचावर उभे राहून त्यांना जागा द्यावी लागते. त्यांच्या गळ्यात बांधलेल्या घंटांची मंजुळ किणकिण ऐकायला छान वाटते. गोकियो री आणि चोला पासला जाण्याचे रद्द झाले याची थोडी रुखरुख जरी असली तरी EBC चा ट्रेक पूर्ण झाल्याचा आनंदही होता. गोरक्षेपच्या Snowland- The Highest Inn मध्ये राहिलेल्या काही परदेशी ट्रेकर्सची वाटेत भेट झाली त्यांच्याकडून समजले की गोरक्षेपला दोघे आजारी पडले, त्यांना हेलिकॉप्टरनी ताबडतोब खाली न्यवे लागले. एक टेकडी चढून गेल्यावर एव्हरेस्ट मोहीम करताना मृत्यू झालेल्या लोकांची स्मारके आहेत. त्यामध्ये बरेच भारतीयही होते आता घाई नसल्यामुळे इथे व्यवस्थित थांबून हे सारे बघता आले आणि नकळत दोन्ही कर जुळून आले अशी स्थळे फारच भावुक करतात.
उतारावर वेग वाढला असला तरी मनसोक्त फोटोग्राफी आणि धमाल मस्ती सुरु होती. कारण आता बॅटरी पुरवून वापरण्याची गरज नव्हती. अनंत राणासर आणि मी पुढे होतो. वाटेत थुकलामध्ये चहा -कुकीज यांचा आस्वाद घेऊन पुढे निघालो. आज पेंगबोचेला ओम कैलास मध्ये मुक्काम होता. वाटेत मुंबई-पुण्याहून EBC कडे जाणारे ट्रेकर्स भेटले. चेहरा बघूनच एकमेकांना ओळखून मराठीत चौकशी आणि गप्पा झाल्या रंगीबेरंगी रानफुलांनी नटलेली भूमी प्रसन्न भासत होती आणि भरपूर फोटो काढूनही आमची गाडी जरा सुसाटच सुटली होती. वाटेत दिसलेल्या एका परदेशी माणसाचे आकारमान बघून हा माणूस ट्रेक कसा पूर्ण करणार अशी शंका तिघांच्याही मनाला चाटून गेली आणि त्याचा फोटो काढण्याचा अनिवार मोह झाला. पेंगबोचे ला जाऊन पोहोचलो तेव्हा काडकडून भूक लागली होती. पण मागे राहिलेल्या ग्रुपची जरा जास्तच मस्ती चालली होती त्यांचे फोटो आणि क्लिप्स आम्ही नंतर हॉटेलमध्ये बघितले. ते येईपर्यंत तिथल्या हॉटेलच्या मालकिणीच्या मुलीशी म्हणजे सात-आठ महिन्यांच्या इशीशी खेळण्यात मस्त वेळ गेला. या हॉटेलची जागा फारच सुंदर होती. डायनिंग हॉलमध्ये सगळीकडे काचा बसविलेल्या होत्या. त्यामुळे भवताल सुरेख दिसत होते. इशी खूप गोड मुलगी होती आणि जुनी ओळख असल्यासारखी सगळ्यांकडे जात होती लहान मुलांना फक्त डोळ्यांची आणि प्रेमाची भाषा कळते. जेवणानंतर लगेच पँगबोचे मॉनेस्ट्री बघायला गेलो. पँगबोचे मॉनेस्ट्री खूप जुनी आहे. इथे यतीची कवटी आणि पंजाचा सापळा बघायला मिळाला. ही कवटी आणि पंजा हिममानवाचा आहे अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. सर एडमंड हिलरी जेव्हा इकडे आले तेव्हा यतीच्या कवटीची व सापळ्याची त्यांना चाचणी करायची होती, परंतु गावकरी त्यासाठी तयार नव्हते. काही काळ गेल्यानंतर गावकऱ्यांसाठी मोठी शाळा बांधून गावकऱ्यांना मदत करायचे त्यांनी ठरवले. तेव्हा तेथील लोक ते तपासणीसाठी द्यायला तयार झाले. त्यांची फॉरेन्सिक तपासणी एडमंड हिलरी यांनी परदेशात पाठवून करुन घेतली व ती हाडे अतिप्राचीन असली तरी मानवाची नसून एखाद्या अजस्त्र पशूची असावीत असा निष्कर्ष निघाला. हिलरी यांनी ती गावकऱ्यांना परत केली गावकऱ्यांनी पुन्हा ती मॉनेस्ट्रीमध्ये ठेवून दिली. मॉनेस्ट्रीमध्ये अतिशय मंद प्रकाश व गूढरम्य वातावरण असते. गर्दी गोंधळ अजिबात नसून अगदी शांतता होती. जुने ग्रंथही ठेवलेले होते. मॉनेस्ट्रीच्या बाहेर मातीच्या सुबक आकाराच्या वस्तू, दिवे, देवाच्या प्रतिमा असे काही बनविण्याचे काम चालले होते. ही मॉनेस्ट्री खुंबूच्या राजाने सोळाव्या शतकात बांधली. त्यानंतर त्याचा जिर्णोद्धारही झाला. खुंबू विभागातील ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. मॉनेस्ट्रीच्या बाहेर झाडावर याकची शिंगे टांगलेली होती. मॉनेस्ट्री टेकडीवर असल्यामुळे सभोवतालच्या नयनरम्य परिसराचे विहंगम दर्शन येथून झाले. जाण्याच्या वाटेवर घनदाट वृक्षराजींनी गडद सावली धरली होती. उतारावरून पटापट खाली आलो आणि मोर्चा थेट बेकरीकडे गेला, पण बेकरीत रविवार असल्यामुळे फक्त नारळाच्या कुकीज होत्या. आज केक बनवले नव्हते. तिथे टीव्हीवर एक जुना हिंदी चित्रपट लागला होता तो सगळेजण बघत बसले. मग नंतर दूध चाय बरोबर त्या खमंग कुकीजचा आस्वाद घेतला. नेपाळी पद्धतीचे पदार्थ खाऊन आता सगळेच जरा कंटाळले होते म्हणून राणा सरांनी संध्याकाळी किचनमधे जाऊन सगळ्यांसाठी अंडा बुर्जी बनवली. त्यावर सगळे जण खूप खुश झाले. आणि सकाळी नाश्त्यासाठीही बुर्जीच पाहिजे हा सगळ्यांचा हट्टही सरांनी आनंदाने पुरवला.
पँगबोचे ते फेरीच हे अंतरही मोठे होते. वाटेत बऱ्याच ठिकाणी ओळखीचे चेहरे दिसत होते. काठमांडूला लवकर पोहोचावे म्हणजे तिथे फिरता येईल असा विचार रात्री झाला होता. जाताना वाटेत थुकलाला जेवण घेतले. जेवणा नंतर चालू लागल्यावर अंधारुन आले आणि पावसाची चिन्हे दिसू लागली. मग नामचे ला खरेदी केलेला नवीन पोंचो काढला. हॉटेल अगदी दुसऱ्या टोकाला होते. तिथे पुन्हा मंजू भेटली. ती आता एकटीनेच परत जात होती. ती लुकलाहून काठमांडूला रस्त्याने जाणार होती. तिच्या हिंमतीची दाद द्यावीशी वाटली.ती ब्लाॕगर आहे. तिचा EBC चा ब्लॉग वाचण्याची उत्सुकता आहे.
फेरीच हून आम्ही सकाळी निघालो. आज खुमजुंगला मुक्काम होता. आरामात जायचे होते खुमजुंग गाव नाव मोठे आहे. नामचे बाजार हून खुमजुंगच्या शाळेत मुलांची ये-जा होती. ही शाळा सर एडमंड हिलरी यांनी बांधली आहे. आवार खूप मोठे आहे. या शाळेमुळे आसपासच्या गावातल्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली आहे.
खुंबू वनविभागाने या सर्व परिसरात उत्तम स्वच्छता ठेवलेली आहे. ठराविक अंतरावर बंद असलेल्या पक्या बांधलेल्या कचराकुंड्या, त्याही वर्गीकृत. त्यामुळे इतस्ततः कचरा फेकलेला कुठेही दिसत नाही. ही स्वच्छता स्थळाचे पावित्र्य आणि सौंदर्य वाढविते. ठराविक अंतरावर स्वच्छतागृहांचीही उत्तम सोय आहे व तेथील स्वच्छता व्यवस्था देखील कार्यरत आहे हे विशेष. या हॉटेलमध्ये एक गोष्ट भारतीयांना मानवत नाही ती म्हणजे स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची व्यवस्था नसते त्यामुळे प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ती व्यवस्था कशी आहे हे आम्ही आधी बघत असू.
खुमजुंगहून नामचे खूप जवळ होते. त्यामुळे फकडिंगला जाऊन मुक्काम करणे सोयीचे होते. पण नामचे गाव मोठे आहे म्हणून तिथेच राहावे असे सगळ्यांनी ठरवले. खुमजुंगचा चढ चढल्यावर ओळखीची टेकडी लागली जिथे अक्लायमॕटायझेशन वॉक साठी आम्ही गेलो होतो.सुंदर रंगीबेरंगी फुलांचे आणि पाखरांचे फोटो काढून टेकडीवरून दिसणारे नामचे गाव बघत, रमत-गमत वेगवेगळ्या रस्त्यांनी सगळे उतरले. दुपारी जेवल्यानंतर सागरमाथा नॅशनल पार्क बघायला पुन्हा टेकडी चढून वर गेलो. हे पार्क छोटेखानी आहे. त्यामध्ये एक वस्तुसंग्रहालय व चित्र प्रदर्शन आहे. सागरमाथा नॅशनल पार्कच्या बाजूला शेरपा म्युझियम आहे. या शेरपा म्युझियमच्या आवारात पूर्वी एव्हरेस्टचा बेस कॅम्प लागल्याची पाटी वाचली. शेरपा वस्तुसंग्रहालयाचे आवार प्रशस्त आहे. संग्रहालय प्रेक्षणीय आहे. येथे ऐतिहासिक माहितीपूर्ण ध्वनीचित्र खेळही दाखविला जातो. सोनम फोटोग्राफर जातीने येथील सर्व व्यवस्था बघतात. एव्हरेस्ट मोहिमेसाठी पूर्वी वापरली गेलेली साधने, जुन्या काळातील लोकांची भांडी इत्यादी वस्तूंचे भव्य प्रदर्शन येथे आहे. तसेच सोनम फोटोग्राफर यांच्या उत्तम छायाचित्रांचे प्रदर्शन व विक्री येथे होते. जगभरातल्या एव्हरेस्ट वीरांची छायाचित्रे, समाजातील विविध उत्सव व चालीरीती यासंबंधी चित्रे व माहिती येथे बघायला मिळते. येथे आढळणाऱ्या वनस्पतींची छायाचित्रे बघून रस्त्याने दिसलेल्या काही वनस्पती ओळखता आल्या. त्यापैकी करवंदा सारखी फळे लागलेली वनस्पती होती तिचे नाव ज्युनीपेरस इंडिको असा बोध झाला. नामचे बेकरी आणि बाजाराची चक्कर झाली.
आजचा शेवटचा दिवस; नामचे ते लुकला हे अंतर कापायचे होते. त्यामुळे लवकर निघालो. सगळ्यांनीच अंतराचा आवाका लक्षात घेऊन उत्तम वेग राखला होता. पण विशेष म्हणजे आदित्य आणि किशोरी आज एकदम फॉर्ममध्ये होते.आदल्या दिवशी नामचे बेकरीत ठराव झाल्यासारखे सातत्याने पुढे पळत होते. आणि त्यांच्या वेगाकडे बघून आम्ही अचंबित होत होतो. लुकलाहून एक दिवस आधी निघून काठमांडूला जायचं होते. पण खराब हवामानामुळे ते शक्य झाले नाही. लुकलाच्या याक हॉटेलमध्ये रात्री एका परदेशी ग्रुपचा EBC पूर्ण केल्याचा आनंद सोहळा जवळून बघितला. त्यांनी त्यादिवशी रात्रीचे जेवण त्यांच्या पोर्टर आणि गाईड बरोबर घेतले. एकमेकांचे प्रवासातले अनुभव, एकमेकांबद्दल काय वाटते इत्यादी सांगितले आणि बिअरचे भरपूर टिन रिचवून त्यांचा टेबलवर मनोरा तयार केला. खूप उशिरापर्यंत त्यांचा हा आनंद सोहळा रंगला होता.
लुकलामधला अर्धा दिवस विमान सुरू होईल का याची वाट बघण्यात गेला. ती आशा मावळल्यावर सामान पुन्हा खोल्यांमध्ये नेले. संध्याकाळी लुकला बाजार फिरणे, मोमोज खाणे, बेकारीत जाणे असे नित्याचे कार्यक्रम झाले. दुसऱ्याही दिवशी विमानाचे उड्डाण होईपर्यंत दुपारचा पाऊण वाजला. हॉटेलमध्ये पोहोचेपर्यंत सगळ्यांना कडकडून भूक लागली होती. पण इकडे सगळा कारभार थंड असतो. सगळ्यांचे सगळे पदार्थ तयार झाल्यावर एकदम आणून देतात. त्यामुळे खूप संयम ठेवून अन्नाची वाट बघावी लागते. जेवण आटपायला बराच वेळ मोडला. त्यानंतर आंघोळ आटपून संध्याकाळची पशुपतीनाथ मंदिरातील आरती गाठायची होती. ट्रॕफिक मुळे फार रखडावे लागले. पण दर्शन व्यवस्थित झाले.आरतीही मिळाली. या आरतीच्या वेळी हरिद्वारच्या गंगेच्या आरतीची आठवण झाली. संपूर्ण वातावरण भक्तीमय होते. सूर-ताल-नृत्य-दीप आणि भक्ती यांनी आसमंत भारावून गेला होता. या भक्तियोगातून बाहेर निघावेसे वाटत नव्हते. तिथून प्रसाद घेऊन गाडीने परत सोडले. काठमांडू मधील झगमगती दुकाने विविध वस्तूंनी फुललेली होती. इथे ट्रेकिंग साठी उपयुक्त वस्तू, ज्वेलरी, कपडे, प्राण्यांच्या गळ्यात बांधायच्या घंटा, पाउच, डफेल बॅग, टी-शर्ट असे बरेच काही मिळते. आमचे हॉटेल काठमांडूच्या भागाचे नाव थमेल होते. थमेलच्या एका चौकात आपल्याकडे मिळतो तसा मस्त मसाला चहा मिळाला. त्या थंडी मध्ये चहा आणि खारी खायला मजा आली. रात्री जेवायला दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. तिथले जेवणही मुंबईत मिळते तसे होते; टोमॅटो सूप, पुलाव, मोमोज सगळे पदार्थ उत्तम होते.
दुसऱ्या दिवशी पहाटे उठून मनोकामना देवीच्या दर्शनासाठी निघालो. हे मंदिर काठमांडू पासून जवळपास सव्वाशे ते दीडशे किलोमीटर दूर पहाडावर आहे. आज जाताना सगळे शांत होते. फार गप्पा न मारता कुणी झोपा घेत होते. जुन्या हिंदी गाण्यांनी ही सकाळ जादूमय करून टाकली. खिडकीतून नवीन प्रदेश बघण्याची गंमतही वेगळी होती.हा प्रदेश आणि इथले वातावरण भारतासारखेच होते. वाटेत थांबून चहा आणि मिसळीशी साधर्म्य असलेल्या नेपाळी नाश्त्याची चव घेतली बरोबरचा नाश्ता अजून तसाच होता. मिरची लावलेल्या लुसलुशीत काकड्या आणि गोड सफरचंद, पेरू यांच्यावर सगळ्यांनी ताव मारला.
इच्छाकामना देवीला जाण्यासाठी रोपवे म्हणजेच उडनखटोला आहे. यातून जाताना डोंगर, दरी, जंगल ओलांडताना दिसणारा परिसर आपली नजर खिळवून ठेवतो. उडनखटोल्याची व्यवस्था उत्तम आहे. देवीच्या दर्शनार्थ रांगेत पाऊण ते एक तास गेला. पण सगळे एकत्र असल्यामुळे कंटाळा आला नाही. तेथेही पितृपंधरवडा चालू असल्यामुळे एवढ्या पटकन दर्शन होऊ शकले. इतर वेळी इथे फार गर्दी असते. देवळाच्या नूतनीकरणाचे काम सुरू होते. त्यामुळे देवी ट्रान्झिट कॅम्प मध्ये होती. हे देऊळ खूप जुने आहे. सोनेरी कळस आहे. चहुअंगांनी देवीचे दर्शन घेऊन आणि प्रदक्षिणा घालून आमचा मोर्चा पोटपूजेसाठी निघाला. डाळ, भात, भाजी, फुलके, रगडा पॅटीस, जिलबी असे मस्त जेवण झाले. जाताना पुन्हा सकाळच्या ढाब्यावर चहापान झाले. काठमांडूमध्ये वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे. जाताना आमचा त्यामुळे बराच वेळ खोळंबा झाला. पण इथल्या सगळ्या चालकांचे वैशिष्ट्य हे की कोणीही सतत हॉर्न वाजवून कान किटवत नाही. रस्ता मोकळा होण्याची बरीच वाट बघून आमच्या चालकानी गाडी दुसऱ्या लांबच्या रस्त्यानी वळवली. मग काही भेटवस्तूंची खरेदी करुन नेपालियामध्ये शेवटचे बुफे जेवण घेतले.
सकाळी नाश्ता करतानाही पुन्हा एकदा सर्व्हिंगच्या विचित्र पद्धतीचा अनुभव आला. नाश्त्याची ऑर्डर दिल्यानंतर आधी चहा आणून दे अशी सूचना केली तर वेटरने फळांचा रस आणून दिला. आणि तो संपायच्या आत चहा हजर होता. यांची हॕश ब्राउन पोटॕटोची संकल्पना संपूर्ण वेगळी आहे असे माझ्या फूड टेक्नॉलॉजिस्ट मैत्रिणीचे ठाम मत बनले. त्यानंतर उरलेली किरकोळ खरेदी आठपून सगळ्यांसाठी सँडविच पार्सल घेतली. हॉटेलच्या लाऊंजमध्ये प्रमाणपत्र वितरण व त्यावर टीका-टिप्पणी चे एक सत्र झाले. आता चौकात उभे राहून विमानतळावर जाण्यासाठी गाड्यांची वाट बघू लागलो. पुन्हा एकदा काठमांडूच्या वाहतूक व्यवस्थेने हिसका दिला. आता विमान मिळते की नाही इतकी जिवाची घालमेल झाल्यावर गाड्या उगवल्या. त्या विमानासाठी चेक इन करणारे आम्ही शेवटचे प्रवासी होतो. विमानामध्ये पुन्हा मंजू ची भेट झाली. ती आणि किशोरी आजूबाजूच्या सीटवर असल्यामुळे त्यांच्या मनसोक्त गप्पा झाल्या. मंजू लुकला ते काठमांडू हे अंतर एकटीने बरेचसे चालत आणि नंतर हात दाखवून मिळेल त्या वाहनाने पार करून आली होती. तिच्या धाडसाला खरंच सलाम ठोकला. एकोणीस दिवसांच्या दीर्घ प्रवासानंतर सगळ्यांना घराचे वेध लागले होते. आनंद, उत्सुकता, ओढ आणि उद्या पुन्हा ऑफिसला जायचं आहे अशा काही संमिश्र भावना घेऊन सगळ्यांचा निरोप घेतला.

Welcome to blogging. Well done.
ReplyDeleteThank u
ReplyDeleteNice trek blog, good experience
ReplyDeleteमस्त ग... कमाल आहात तुम्ही सर्व
ReplyDelete