Saturday, May 16, 2020

सारपास

                                            स्वप्नांच्या पलीकडला प्रवास - सारपास

         
           मुंबई-दिल्ली -कुलू-भूँथर असा प्रवास करत चार मे च्या सकाळी आम्ही कसोल येथे सारपासच्या बेस कॅम्पला जाऊन पोहोचलो. हिरव्यागार वृक्षांनी वेढलेले छोटेसे मैदान, एका बाजूला खळखळ वाहणारी पार्वती नदी, दुसऱ्या बाजूला उंचावरून वळणा-वळणाने जाणारा डांबरी रस्ता व त्यापलीकडे देवदार वृक्षांचे घनदाट जंगल असे हे सुंदर ठिकाण होते. मागच्या बाजूला सूर्यकिरणांनी चमचमणारी हिमशिखरे साद घालीत होती. स्वागत कक्षाचा तंबू रंगीबेरंगी होता, तेथे नोंदणी झाली.


  गरमागरम चहा पिऊन मग जवळपास गोठायला आलेल्या त्या पाण्याने आंघोळ करण्याचे दु;साहस केल्यावर प्रवासाचा सगळा थकवा निघून गेला. जेवणानंतर कसोल गावात चक्कर मारायला बाहेर पडलो तेव्हा छान ऊन पडले होते. पार्वती नदी व हिमशिखरांच्या कुशीत वसलेले कसोल हे एक छोटेसे खेडे आहे. परंतु इंटरनेट सारख्या अत्याधुनिक सुविधा ही इथे पोहोचलेल्या आहेत. तिथे पर्यटनाच्या निमित्ताने आलेले व इतरही बरेच इस्रायली लोक दिसतात. काही दुकानांच्या पाट्याही इस्रायली भाषेत दिसल्या. हॉटेलच्या छोट्या-मोठ्या इमारती,बैठी घरे, लोकरीच्या कपड्यांनी नटलेली दुकाने, सायबर कॕफेज, राॕयल एनफिल्ड वरून फिरणारे देशी-विदेशी पर्यटक, मधूनच जाणारे शेळ्या-मेंढ्यांचे मोठाले कळप आणि प्रत्येक कुंपणावरून आपल्याला खुणावणारे रंगीबिरंगी टपोरे गुलाब असा हा सर्व माहोल होता.

        अतिशय उंचीवरील विरळ हवेची शरीराला सवय होण्यासाठी तीन दिवस बेस कॅम्पला राहावे लागते. येथे रात्री कॅम्पफायर मध्ये रोज एक-एक बॅच सांस्कृतिक कार्यक्रम सादर करते. मॉर्निंग एक्झरसाइज, अक्लायमेटायझेशन वाॕक, रॉक क्लायंबिंग, रॕपलिंग, परस्पर परिचय, पुढील तयारी इत्यादी गोष्टी या तीन दिवसात होतात. त्याशिवाय आम्हाला मनसोक्त हिंडायला मिळाले नदीकिनारी झाडीत व देवदार वृक्षांच्या जंगलात विविध आकारांचे, विविध रंगी पक्षी दिसले. रुबीथ्रोट, पॅराडाईज फ्लायकॅचर  ज्युवेनाइल, मॕगपी, रावेनस् इत्यादींची ओळखही पटली. त्याशिवाय अफूची झुडुपेही काही ठिकाणी दृष्टीस पडली.


कसोल गावात पुलावरुन पलीकडे गेले की गरम पाण्याचे झरे आहेत. मणिकर्ण हे पौराणिक महात्म्य असलेले स्थानही  येथून ४-५ किमी अंतरावर आहे. शंकर-पार्वती विहार करीत असताना पार्वतीच्या कर्णकुंडलातील मोती येथे पडला. तो शोधण्यासाठी वासुकी नागाला पाचारण करण्यात आले. मग वासुकी नागानी जी फुंकर मारली त्यातून प्रथम मणि बाहेर पडला व मग गरम पाण्याचे झरे वाहू लागले, अशी दंतकथा आहे; म्हणून नाव मणिकर्ण. एवढ्यात थंड हवेत येथील कुंडांमध्ये स्नान करणे म्हणजे निव्वळ चैन असते.

        आठ मे ला सकाळी सर्वांचा निरोप घेऊन आम्ही ग्रहण कॅम्पकडे जाण्यासाठी निघालो. ग्रहणची कॅम्प साईट चहूकडून डोंगरांनी वेढलेली होती. जवळच एक ओढा होता. त्याचेच पाणी नळीनी कँपपर्यंत आणलेले होते. ग्रहण कँपच्या जवळ गाव होते. ग्रहणमधील लाकडी घरे विशिष्ट पद्धतीची आहेत. इथे घरोघरी विणकामाचे हातमाग होते. चाँद युवा  नावाचे एक एनजीओ इथे काम करते. त्यांच्याकडून येथील लोकजीवन इत्यादीची माहिती मिळाली.

         वरच्या सर्व कॅम्पसमध्ये रोज संध्याकाळी सूप






 देण्यात येते. थंडगार हवेत निसर्गाच्या सान्निध्यात त्या
सूपची मजा ही वेगळीच असते. क्षणाक्षणाला निसर्ग त्याची रूपे पालटत असतो आणि तो एक एक क्षण जगताना, जपताना, साठवताना आपण आपल्याही नकळत त्याच्याशी एकरूप होऊन जातो.
        ग्रहण ते पद्री ही वाट निबिड अरण्यातून जाणारी होती. पाऊस पडून गेल्यामुळे आधीच उताराची असणारी वाट अधिक निसरडी झाली होती. वाटेत लाल-गुलाबी-केशरी रंगाचे मखमली फुलांचे गुच्छ लागलेली बरीच झुडुपे होती, त्यांचा मंद सुगंध, रानफुले आणि मधूनच दर्शन देणारी हिमशिखरे यामधून होणाऱ्या प्रवास म्हणजे 'राह बनी खुद मंझिल' असाच होता.

        झुळझुळ वाहणाऱ्या  झऱ्याच्या  एका बाजूला तंबू, त्यामागे अगदी जवळ दिसणारी हिमशिखरे तर दुसऱ्या बाजूला गर्द झाडी अशी होती पद्री कँपसाइट. इथल्या जंगलामध्ये अस्वले व वन्यप्राणी खूप आहेत. त्यामुळे एकेकट्याने लांब फिरायला जाणे धोक्याचे असते. इथे लेडी बग नावाचा एक चमकदार गडद लाल रंगावर काळ्या रंगाची नक्षी असलेला किडा दिसला. इथे सृष्टीसौंदर्याचा आस्वाद घ्यायला भरपूर अवकाश मिळाला. अशा शांत निवांत ठिकाणी घालवलेले, चित्तवृत्ती एकाग्र झाल्यावर जगाचा विसर पाडणारे काही क्षण म्हणजे आपल्या आयुष्यभराची पुंजी असते.

             पदरी ते रातापाणी हा सर्वात लांब ट्रेक होता. घनदाट जंगलातून तीव्र उतारावरून हजार फूट उतरल्यानंतर तीन हजार फूट चढाई होती. दुपारी दोनच्या जवळपास आम्ही लंच पॉइंटला पोहोचलो. त्या जागेवरून सभोवतालचा विस्तीर्ण भूप्रदेश दिसत होता. डावीकडे खोल दरी होती. समोर जवळ येत जाणारी हिमशिखरे व मागे घनदाट जंगल होते.पोहोचलो तेव्हा छान ऊन पडले होते. पण क्षणात आकाशाचे रंग पालटू लागले. पुढे बर्फातून चालायलाही गंमत येत होती. शेवटी एक छोटासा रॉक पॅच चढढून गेल्यावर रातापाणी कॅम्पच्या बॅनर जवळ आम्ही पोहोचलो. ती जागाही कुणीही चिकटवून बसावे अशीच होती. त्या टोकावर खाली खोल दरी होती वर पावसानंतर स्वच्छ झालेले निळे आकाश होते आणि दूरवर ग्रहण व पद्री कँप दिसत होते. करड्या रंगाचा उंच उडणारा ग्रिफन हा पक्षी दिसला.


             रातापाणी कॅम्पही भरगच्च झाडीने वेढलेला होता. पाण्याचा नळाच्या बाजूलाच शेकोटी होती. त्यामुळे त्या थंडगार पाण्यात हात घातला की लगेच शेक घ्यायचा. त्या शेकोटीजवळ कितीतरी वेळ गप्पांना रंगत आली होती. ग्रहणमधील कॅन्टीन वाले दोघेजण त्यात सामील झाले.त्यांची बोली भाषा कुलवी;  त्यांचे मुख्य व्यवसाय म्हणजे शेती व मेंढ्या पाळणे.  सूरदासांच्या दोह्यांनी या गप्पांची सांगता झाली.


         नगारूला जाताना पिवळी -जांभळी अशी छोटी-छोटी रानफुले लक्ष वेधून घेत होती. बर्फाचे टप्पे पार करून जाताना आकाशात उंच झेपावणारे गरुड व घारी दृष्टी खिळवून ठेवत होते. त्या उंचीवर पोहोचल्यावर तर 'आज मै उपर आसमाँ नीचे'असे सर्वांचे चेहरे प्रफुल्लीत झाले. नगारूचे तंबू बर्फात लागलेले होते. दृष्टि जाईल तिथे सगळीकडे हिमाच्छादित भूमी दिसत होती आणि आमच्या स्वागतासाठी आकाशातूनही हिमवर्षाव सुरू झाला. हिमवर्षावाचा आनंद लुटत असतानाच आकाश स्वच्छ होऊन लख्ख ऊन पडले. आता आकाशात सूर्य किरणांचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. त्या आकाशाच्या कॅनव्हासवर पांढऱ्या शुभ्र  ढगांचे पुंजके व त्याखाली सरळ दोन रेषा ओढल्या सारखा पिवळ्या रंगाचा पट्टा, त्यामध्ये तांबूस लाल सूर्यबिंब आणि हे लोभसवाणे चित्र पाहायला हळूच डोकावणारा चांदोबा दिसत होता. मंत्रमुग्ध होऊन हा खेळ पाहत असताना कॅमेरा आणण्याचे भान येईपर्यंत चांदोबा ढगांशी लपाछपी खेळताना लपून बसला होता आणि सूर्य त्याची ०६:३६ ची लोकल पकडून निघून गेला होता. त्यावेळी मनात आले की आपण कधी अशा स्वर्गलोकी येऊ अशी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.


             जेवण झाल्यावर आम्ही झोपण्याच्या तयारीत होतो. सर्वत्र दाट काळोख व्यापून राहिला होता. इतक्यात विद्युल्लतांचा लखलखाट सुरू झाला. घोंगावणारा वारा आणि वादळ यांचे तांडव सुरू झाले. डोळे गच्च मिटून आम्ही चौघी पडून होतो. आणि आपल्या  डोक्यावरचा हा तंबू आता उडून जाणार याची आम्हाला जवळ जवळ खात्री वाटत होती. अशातच माझा अर्धवट डोळा लागला असेल. मला जाग आली तेव्हा इतर तिघी जणी उठून तंबूच्या दोऱ्या ओढून बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. म्हणजे अजून तंबू जागेवर होता तर!


          गरम चहा-नाश्ता घेऊन पहाटे चार वाजता टॉर्चच्या प्रकाशात एका लांबच-लांब रांगेतून आम्ही त्या बर्फातून चालू लागलो. तापमान शून्य डिग्री सेल्सिअसच्या आसपास होते. सारी सृष्टी पांढरी शुभ्र बर्फाची चादर पांघरुन गाढ झोपेत होती. आकाश निरभ्र होते. थोड्याच वेळात रविराजांचे आगमन झाले व चारी दिशा उजळल्या. सूर्योदयाच्या त्या अपूर्व उत्सवात तना-मनाने सहभागी होऊन आम्ही साधारण आठ वाजता सारपासला पोहोचलो. सारपासची उंची साधारण चौदा हजार फूट आहे. आत्तापर्यंत शांततेने मार्गक्रमण करणाऱ्या सर्वांच्या उत्साहाला एकदम उधाण आले. कोणी उड्या मारून, कोणी हर्षभराने जल्लोष करून, तर कोणी तिरंगा फडकवून हा आनंद साजरा केला. याचसाठी केला होता अट्टाहास.....



             
आता उतार सुरू झाला. बर्फामध्ये घसरगुंडी करुन जायला विलक्षण मजा येते. स्लायडिंग करताना बरोबर पोझिशन घेऊन जाता आलं तर ठीक आणि जर पोझिशन चुकली, पाय घसरला तर गडगडत जावे लागते; असे कौशल्यही काही जणांनी दाखवले. बर्फामध्ये चालण्याची, पडण्याची, खेळण्याची, घसरण्याची पुरेपूर मौज इथे अनुभवता आली.


            बिस्केरीला सूर्यास्ताच्या वेळेस सूप घेताना दूर पर्वतरांगांमध्ये कोसळणारा जलप्रपात दिसत होता. आणि अचानक त्यावर सूर्यकिरण पडून एक लांबलचक लोभसवाणे इंद्रधनुष्य दिसू लागले. बाह्यचक्षू आणि अंतःचक्षू  दोन्ही मंत्रमुग्ध होऊन गेले. बिस्केरी-पुलगा-बरसैनी हा ट्रेक तीव्र उताराचा आहे. वाटेत एका ठिकाणी हिरवंगार मैदान लागलं. त्यापलीकडे शिस्तीत उभे असलेले देवदार वृक्ष दिसत होते. या वाटेनी जाताना तरु-वेलींना, गिरीशिखरांना,धबधब्यांना आणि नदी-नाल्यांना अच्छा-टाटा म्हणताना मन जडावले होते.

              महाराष्ट्र , गुजराथ, दिल्ली, कर्नाटक आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या प्रांतातून आलेले आम्ही सर्व जण इतके दिवस एकत्र प्रवास करत होतो. प्रत्येकाचे वय वेगवेगळे; विक्रम कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होता तर नागपूरच्या नाना आगाशे साठ वर्षांचे होते. प्रत्येकाचे व्यवसायही वेगवेगळे; कोणी सरकारी अधिकारी, कोणी संशोधन क्षेत्रात, कोणी हॉस्पिटलमध्ये, कोणी बँकिंग/ फायनान्स मध्ये, कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर्स, कोणी पोलीस तर कोणी दागिन्यांचे व्यापारी. असे सर्व भिन्न प्रकृतीचे भिन्न भाषिक लोक आपली ओळख विसरून एकमेकांमध्ये कसे मिसळून गेलो ते कळलेही नाही. एकमेकांची थट्टा मस्करी करत आणि एकमेकांची काळजी घेत अकरा दिवस बघता-बघता भुरकन उडून गेले.


   बेस कँपला शेवटच्या रात्री कँप फायरमध्येआम्हाला सर्वांसमोर आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. तेथे पुढे जाण्यासाठी तयार असलेल्या तीन बॅचेस होत्या. त्या सर्वांना वर परिस्थिती कशी आहे याबद्दल कमालीची उत्सुकता आणि बराचसा ताण वाटत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी तुमचा अनुभव ऐकून व प्रफुल्लित चेहरे बघून आमचं टेन्शन गेलं, अशी पावती जेव्हा आम्हाला काही जणांकडून मिळाली तेव्हा खरंच समाधान वाटले. प्रसन्न  मनाने सर्वांचा निरोप घेऊन आम्ही कसोल कँप सोडला तो फिरून कधीतरी पुन्हा इथे येण्याचा निश्चय करुनच.....






































7 comments:

  1. यावर्षीचा सरपास हुकला माझा. चूक कि बरोबर येणारा काळाच ठरवेल. तू नेहमीप्रमाणेच छान लिहिलंयस.

    ReplyDelete
  2. वाह.
    हा ट्रेक मी २०११ मध्ये केला होता नि त्याचे प्रवासवर्णन 'पहिले पाऊल' या पुस्तकाद्वारे प्रकाशित केले. तुमचा ब्लॉग वाचून आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete
  3. मस्त २५ वर्ष जुन्या आठवणींना उजाळा दिलास लेख वाचून पुन्हा सार पास ला जावून आले अस वाटल

    ReplyDelete
  4. नमिता👍

    सारपास ट्रेक एकदम झक्कास!!!👌

    खूप रम्य स्वप्नांच्या पालिकडचा प्रवास अनुभवला.
    मे 2011 मध्ये केलेल्या ट्रेकचे अनुभव नऊ वर्षानंतर सुद्धा जसेच्या तसे लिहिले आहेस, कमाल आहे तुझी. एखादी गोष्ट मनापासून केली असेल, तिचा अनुभव मनसोक्त घेतला असेल तर ती कधीही विसरू शकत नाही. खूप छान शब्दचित्र आहे.

    ह्या लेखातील, निसर्गाचे वर्णन आणि गाण्यांची खुमासदार पेरणी अप्रतिम. लेखाला जिवंत करतात. पुढे काय पुढे काय याची उत्सुकता वाढवतात.

    तुझे वर्णन आणि फोटो पाहिल्यावर ते चित्र बोलू लागते. स्वतः तेथे आहोत असा भास होतो.

    आज मै उप्पर आसमा नीचे, राह बनी खुद मंजिल ही गीते संपूर्ण ट्रेक फिरवून आणतात.

    सारपास ट्रेक मी दोन वेळा केला, तुझ्या लेखाने तिसऱ्यांदा फिरून आलो सारपास

    खूपच छान .... अप्रतिम लेख .....


    सतीश जाधव

    ReplyDelete
  5. खुप मस्त वाटल वाचुन. हिमालयाची वेगवेगळी रुप छान वर्णन केली आहेस.वाचता वाचता भुतकाळात पोहोचलो. ग्रहण पद्री वगैरे नाव वाचुन १९८६ मे महिन्यात केलेल्या खौली पास ट्रेकच्या आठवणी जाग्या झाल्या.

    ReplyDelete