Monday, February 17, 2025

मुंबई ते गोवा

  मुंबई ते गोवा - एक मनोहर सुगंधी सायकल यात्रा

"अरवलीच्या, शिरोड्याच्या, आजगावच्या देवा वेतोबा आत्ता पर्यंत आमची सायकल यात्रा जशी सुरळीत पार पडली तशीच आज पूर्ण होऊ देत असं गा-हाणं घालून,  आजगावला आमचे कुलदैवत भूमिका माता आणि वेतोबाला नमस्कार करून पुढे, मळेवाड जंक्शन- सातर्डा गाठले. सातर्डा आले तसे भूदृश्य एकदम बदलले. रस्त्याच्या दुतर्फा भातशेती लागली आणि सातर्डा सोडल्यानंतर अजगरासारखा अस्ताव्यस्त पसरलेला NH६६ आला. पणजीत पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मोहीम फत्ते झाली.”

मुंबई ते गोवा सागरी महामार्ग  नितांत सुंदर आणि रमणीय आहे. त्यातच डिसेंबर जानेवारीची कोकणाला आल्हाद देणारी थंडी होती. ११ जानेवारी २०२५





ला पॅनीअर मध्ये सामान भरून पहाटे ६.३० ला घर सोडले. यथावकाश लोकलनी CST आणि नंतर सायकलनी गेट वे गाठले. दीड तास रांगेत प्रतीक्षा केल्यानंतर लॉंचनी मांडवा इथे पोहोचलो आणि दुपारी बरोबर १२.३० ला जय श्रीराम, गणपती बाप्पा मोरया म्हणून पेडल मारायला आरंभ केला.

मांडाव्याहून निघाल्यावर आवासचा बस स्टँड माझ्या खापर पणजीची आठवण घेऊन आला; हिनी रस्त्यासाठी जमीन देताना मोबदला न घेता माझ्या फाटकात बस थांबा करा अशी अट घातली होती. आवासचे कानिटकरांचे घर, इथे बैलगाडीमधून फिरतानाच्या आठवणी क्षणभर तरळून गेल्या. किहिममध्ये प्रवेश करताच इथे झालेल्या प्राथमिक शिक्षा वर्गाच्या आठवणीही मनात रुंजी घालू लागल्या.

आता पोटोबा बोलू लागले, वैभव हॉटेलमध्ये जेवलो.   नागावला तर हल्लीच येऊन गेलो होतो, सागरगड ट्रेकसाठी. चौलला लेल्यांच्या घरी लेल्यांबरोबर जत्रेच्या वेळी केलेली मजा हा तर खास आठवणींचा कोपरा. मुरुडला संध्याकाळी पोहोचलो. फार शोधाशोध न करता मुरुड सागर किना-यावार एलिगंट हॉटेलमध्ये मुक्कमासाठी खोली मिळाली. व्यवस्थापक मुलगा साधा वाटला. No alcohol च्या सूचनेकडे निरागसपणे आमचे लक्ष आहे ना याची खात्री पुस्तकात नोंद करण्याआधी त्यांनी करून घेतली. त्यानी लगेच चहा-पाण्याची सोय केली. जेवण करून येताना बकुळीची फुले वेचली, त्यांचा गंध घेत शांत झोप लागली.  दुस-या दिवशी सकाळी दिघीच्या लोंच मध्ये गुजराथची विशी भेटली. ही शुक्रवारी घाटकोपरहून निघाली होती. एकटीनीच सायकल वरून गोव्यापर्यंत फिरून येण्याचा तिचा मानस होता. शांतपणे दर दिवशी ४०-५० किमी अंतर कापत फिरत-फिरत जाणार होती, विशेष म्हणजे हा प्रवास ती पहिल्यांदाच करत होती. ती हरिहरेश्वरकडे गेली.



आम्ही दिघी ते बागमांडला 🚴‍♀️वेळास मार्गे गेलो. बागमांडला-कोलमांडला मागे सोडताना पूर्वी बागमांडलयाच्या समुद्रकिनारी अनुभवलेली एक शांत संध्याकाळ आठवली.  इथून जाताना मोठा घाट चढ संपवून उतरताना मी जोरदार आपटले, गुडघे सडकले. देवाची कृपा म्हणून एवढ्यावरच निभावले. दुपारनंतर आधी कस बघणारे चढ होते आणि नंतर तीव्र उतार, खडखडाट रस्ता. पण मांदिवली आल्यावर मात्र वेलकम टू मान्दिवली असे मुलांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

बाणकोट- मांदवली-केळशी असा गावा-गावांमधून वळणा-वळणांचा प्रवास झाला आणि केळशीला आंबाडीच्या भाजीला खमंग फोडणी घातल्याचा ओळखीचा वास आला. वं. ताईचे जन्मगाव आंजर्ले, गाठेपर्यंत अंधार दाटला. मुर्डीच्या जोशी काकांचे घरही खूप जिव्हाळ्याचे; त्यामुळे इथे आल्यावर त्यांची आठवण आपसूकच आली.   

जागोजागी गावातील मुले उत्साहाने हाय करत, टाळ्या द्यायलाही उत्सुक असत. मोठी माणसे कुठून आलात कुठे चाललात वगैरे आपुलकीने चौकशी करत. तिखट चढ असले तरी बकुळ, पांढरा चाफा, लाल चाफा, रातराणी, प्राजक्त,  सोनचाफा, जाई-जुई यांनी सुगंधी केलेले, सावली धरलेले मार्ग थकव्याला थारा द्यायला तयार नव्हते. वाटेतली २-३ रिसॉर्ट फुल होती पण आमच्यासाठी आंजर्ल्यामधले पहिलेच घर दिव्यांच्या माळा लावून स्वागत करत होते.  अजय शिगवण यांच्या

साई समर्थ होम स्टे मध्ये मुक्कामी राहिलो. जेवण रुचकर आणि नाश्त्याला गरमागरम आंबोळ्या- चटणी, वाफाळता चहा मिळाला.   

रात्री आंजर्ल्यामधल्या मन्दिरात कीर्तन सुरू होते: कमला नावाची गणेश भक्त- मोरयानी हिच्या भक्तीने प्रसन्न होऊन विप्र रूपात हिला दर्शन दिले. हिचा मृत पती राजपुत्र धनंजयाच्या कुडीत प्राण फुंकले आणि प्रसन्न होऊन तिला वर दिला की तू जेंव्हा-जेंव्हा माझें स्मरण करशील तेंव्हा-तेंव्हा तुला मी दर्शन देईन. कीर्तनकार बुवांच्या रसाळ वाणीने वातावरण प्रसन्न, भक्तीरसमय झालं होतं. सारा परिसर आश्वस्त करत होता. 

आंजर्ले-हर्णे -दापोली रस्त्यावर गिम्हवणे नावाचं टेकडीवर वसलेलं एक सुंदर गाव भावून गेलं. दापोली कृषी विद्यापीठ परिसर, दापोली-दाभोळ रस्ता सरसर मागे सरले. दाभोळच्या रस्त्यावर सायकलवर भारत भ्रमण केलेले दाभोळचे सायकलपटू संदेश चव्हाण यांची वळणेच्या अलीकडे भेट झाली. ते स्कूटरवर होते; पण थोडा वेळ त्यांनी माझ्या सायकलच्या वेगाशी जुळवून घेत आवर्जून सोबत केली म्हणून ओळख झाली. वळणे पॉइंटला जेवण मस्त मिळाले. 

रत्नागिरी गॅस कं. पर्यंत कस बघणारा  चढ होता. पण नंतर मात्र सुसाट रस्ता मिळाला.

गुहागरला मुक्काम समीर घाणेकर आणि श्रध्दा घाणेकर यांच्या अभंग होम स्टे मध्ये केला. त्यांचा सातवीतला मुलगा अर्णवही खूप चुणचुणीत होता.

मागच्या बाजूच्या नारळी-पोफळीच्या बागेच्या सोबतीनी हे वास्तव्य मनोहर चित्रासारखे केले.

रात्री वैद्य यांच्याकडे फणस घालून केलेली भोगीची भाजी, भाकरी आमटी भात, चटणी लोणचं असे चविष्ट जेवण आणि गप्पा झाल्या. भोगी आणि संक्रांती दिवशी इथे घराबाहेर पडत नाहीत म्हणे. 

सकाळी घाणेकर दांपत्याशी ओळख, गप्पा झाल्या; श्रध्दा समितीची सेविका होती.  आणि आंजर्ले तिचं माहेर म्हणजे कालची आमची राईड तिच्या माहेराकडून-सासराकडे झाली होती. तिनी सायकलिंगबद्दल खूपच उत्सुकता दाखवली. 

दान दिलेल्या भूमीवर कसे राहायचं म्हणून परशुरामांनी  निर्माण केलेली ही भूमी कोकण भूमी; पंचायतनांचे, व्याडेश्वराचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात झाली.

             " तवसाळच्या वाटे वैराण सडे,

               लावावी वाटे हिरवीगार झाडे " 

तवसाळकडे जाताना असा वैराण प्रदेश होता. वाटेत न जेवता तडक फेरी पकडायला पोहोचलो; पण १२.४० ची फेरी जराशानं चुकली; मग वडापाव, लाडू, केळी असा अल्पोपहार करून २ ची फेरी मिळाली; पालशेतच्या तिखट चढाई नंतर बकुळीनी आणि भजनाच्या सुरांनी मन प्रसन्न झालं. वाटेत मालगुंडला थंडगार कोकम सरबत आणि आता इथेच राहावं की पुढे जावं यावर गरमागरम चर्चा झाली.  

गणपतीपुळ्यानंतर तीव्र चढाईवर समोरून येणाऱ्या एकानी हातांनी हळू जा अशी खूण केली आणि थांबायला भाग पाडलं. मग मला थांबलेलं बघून मागून येणारी स्कूटर थांबली आणि मागे बसलेला माणूस Do u need any help? असे विचारू लागला. मी नाही असे मराठीत सांगितल्यावर चक्क अरे तुम्ही मराठी वाटतच नाही, फॉरेनर वाटता असे म्हणाला; वास्तविक माझा चेहरा आत्तापर्यंत उन्हानी काळवंडून माकडासारखा झालेला होता. कदाचित आपल्याकडेही त्यांना फॉरेनर cyclist जास्त दिसत असतील, म्हणून असेल. उंडी, काशिदभाटवडे बीच शांत पहुडले होते. आरे-वारे सागर किनारे तर छानच आहेत.  वाटेतलं रीळ गावही आवडलं.


         अथर्व शेंड्ये, गणपतीपुळे याची रत्नागिरी जवळ भेट झाली. हा yougest super रॅंडोव्हर होता. हे दोघेही सायकलपटू आमचे मित्र आणि खेडचे सायकलपटू विनायक वैद्य यांना ओळखत होते. मुक्काम रत्नागिरीच्या माझ्या मैत्रिणीनी सुचवलेल्या होटेल अल्फामध्ये केला.

कोकणातले रस्ते कधी आवळा सुपारी वाळवतानाचा वास, तर कधी बासमती तांदूळासारखा वास येणाऱ्या गवताचा सुगंध देत होते. आडिवरेला महाकालीमातेचे व रवळनाथाचे दर्शन घेऊन मामीनी सांगितल्या प्रमाणे रु ५००/- ची देणगी देवस्थानाला दिली. आडिवऱ्याची महाकाली काळ्यांचे म्हणजे माझ्या सासुबाईंच्या माहेरचे कुलदैवत आहे. देवळाच्या आवारातील श्री भोजनालयात आमटी-भात-भाजी-शिरा असे जेवून आणि पुन्हा पुढे जावे की इथेच राहावे यावरुन प्रेमळ खटका उडाला. आडिवरे ते मालवण अंतर दुपारनंतर कापणे जरा अवघड होते. पण वाटेत कोणत्या गावी मुक्कामाची सोय होऊ शकते यांची थोडी चाचपणी मी केली होती. आम्हां दोघा सायकल स्वारांना बघून एक कार रस्त्यात थांबली. गुहागरच्या घाणेकरांनी त्यांचे नाटे येथील मित्र रानडे असे दोन सायकलस्वार तुम्हाला रस्त्यानी दिसतील आणि कदाचित तुझ्याकडे राहायला येतील असा  त्यांना सकाळी फ़ोन केलेला होता. त्यांनी आमची विचारपूस केली आणि त्यांचे अग्रो रिसॉर्ट कुठे आहे हे सांगून अवश्य या, फ़ोन करा असे बोलून ते निघाले. नाटे जवळच्या पवार यांच्या यश होम स्टे मध्ये उत्तम सोय झाली.

           जैतापूर मागे सोडल्यावर कात्राबाईला कोकम सरबत घेतले. इथे मैदानात क्रिकेट मॅच होती, खेळाडू, समालोचन, प्रेक्षक यांच्यामुळे वातावरणात चैतन्य सळसळत होते.  वाटेत सायकलनी जानशी हायस्कूलला जाणारी मुलं भेटली. ती आम्हाला बघून आणखी जोशात पेडल मारू लागली. पडेल कॅन्टीन येथील पाटणकर मेडिकल स्टोअर मध्ये ORS घ्यायला गेले तेव्हा पाटणकर यांनी कुठून-कुठे वगैरे खूप आस्थेनी चौकशी केली. चहा कॉफीचा आग्रह केला, बिलात सूट दिली.

         मालवणला मुक्काम माझ्या बहिणीच्या माहितीच्या माधुरी होम स्टे मध्ये केला. इथल्या श्रावणी हॉटेल मधल्या जेवणानी अगदी निराशा केली पण नाक्यावरच्या एका साध्या हॉटेलमध्ये सकाळी चहा-पोहे मात्र चांगले मिळाले.  

  मालवणहून निघाल्यावर म्हापणला देवीचे दर्शन घेतले;  थोडा खाऊ खाऊन, पाणी पिऊन पुढे निघालो. आंब्याचा मोहोर, बकुळ असे सुगंध, दिमाखात फिरणाऱ्या लाल पऱ्यांचे सौजन्यशील चालक अशी आमची सायकल यात्रा चालली होती. वेंगुर्ल्याला जेवण उत्तम मिळाले. तिथे ठाण्याची, परळची माणसं भेटली. सगळ्यांनी आपुलकीनी चौकशी केली कुठून आलात, कुठे चाललात, किती दिवस लागले वगैरे वगैरे. मग आपल्याला नाही बुवा जमणार अशी यांची आपापसात चर्चा झाली.

वि. स. खांडेकरांचं शिरोडा आलं. त्यांच्या नावाचे इथे  विद्यालय आहे. शाळेच्या आवारात खेळणारी मुले, त्यांचा चिवचिवाट ऐकल्यावर एकदम उत्साह आला.  मुक्कामासाठी हॉटेल माहेर गूगलवरून श्रीकांतनी आधीच हेरून ठेवलेलं होत॑.  हॉटेलचे आवार झाडी राखून होते. वर गेल्या-गेल्या गॅलरीतून खंड्याचे दर्शन झाले. इथल्या जेवणातल्या गरमागरम मऊसूत पोळ्या, भाजी, वरण-भात खाऊन आत्माराम तृप्त झाला.  रात्री शतपावली करताना कळवा-डोंबिवली येथील तिघे सायकल स्वार भेटले. त्यांनीही आमच्याबरोबरच शनिवारी ठाण्याहून सुरुवात केली होती आणि उद्या अरोन्द्याला जाऊन सावंतवाडीहून परत जायचं असा त्यांचा कार्यक्रम होता. त्यांच्या कडून पणजी मधून नाईक ट्रॅव्हल्सच्या बसेस मिळतात हे कळलं.


ठाण्याच्या चश्मेवाल्या व्ही. ए. मयेकरांनी बांधलेलं हे हॉटेल, काशिनाथ नाईक हे इथले मॅनेजर आहेत. इथे सगळेच खूप आपुलकीने वागले. नाईकांनी स्वतः सकाळी लवकर चहा करून दिला. मी पोहे करू का म्हणून विचारल्यावर कांदे-पोहे करायला सगळे जिन्नस काढून मला दिले; त्यामुळे गरमागरम पोहे सकाळी लवकर मिळाले. सायकलची चेन साफ करून तेल घातले. अरवलीच्या, शिरोड्याच्या, आजगावच्या देवा वेतोबा आत्ता पर्यंत आमची सायकल यात्रा जशी सुरळीत पार पडली तशीच आज पूर्ण होऊ देत असं गा-हाणं घालून,  आजगावला आमचे कुलदैवत भूमिका माता आणि वेतोबाला नमस्कार करून पुढे, मळेवाड जंक्शन- सातर्डा गाठले. सातर्डा आले तसे भूदृश्य एकदम बदलले. रस्त्याच्या दुतर्फा भातशेती लागली आणि सातर्डा सोडल्यानंतर अजगराला सारखा अस्ताव्यस्त पसरलेला NH६६ आला, एकही झाड नाही, सततचा बारीक चढ, अगदी रटाळ चाललं जरा वेळ.  पणजी मध्ये जिथे-तिथे मेट्रो ची की कसली कामं सुरू होती. मला तर घोडबंदर रस्त्याची आठवण झाली. पणजीत पोहोचल्यावर देवाच्या कृपेने मोहीम फत्ते झाली. मग काय डोसा, उत्तप्पा, दही-वडा, सँडविच, फालूदा अशी चंगळ केली. आणि हॉटेल रिट्झ क्लासिक जवळच्या खाजगी बस स्थानकातून ४.४५ ची परतीची बस पकडली. घरी गेल्यावर माझी हर्षदा (ट्रेक ८.२ डी.एस.) आणि श्रीकांतची हर्षाली (स्कॉट सबक्रॉस 25) दोघींनी आम्हाला एवढ्या दूर फिरवून आणलं, एकदाही काही त्रास दिला नाही म्हणून दोघींचीही द्रुष्ट काढली. 


दिवस १-                                   

मांडवा ते मुरुड ६५ किमी,  (ठाणे ते गेटवे ट्रेन, गेट वे ते मांडवा लॉन्च रु १७०+१०० प्रत्येकी)    

दिवस २ -                                   

मुरुड ते आंजर्ले ९२ किमी (आगरदांडा ते दिघी लॉंच; रु ४५/- प्रत्येकी,  दापोली ते धोपावे फेरी रु ३५/- प्रत्येकी)    

दिवस ३ -                                  

आंजर्ले ते गुहागर ७९ किमी (दाभोळ ते वेलदूर फेरी रु ३५ प्रत्येकी).       

दिवस ४ -                                   

गुहागर ते रत्नागिरी ७० किमी (तवसाळ ते जयगड फेरी प्रत्येकी रु ५५/-)

दिवस ५ -

रत्नागिरी ते नाटे ५२ किमी 

दिवस ६ -

नाटे ते मालवण ९२ किमी 

दिवस ७ -

मालवण ते शिरोडा ६१ किमी 

दिवस ८ -

शिरोडा ते पणजी ५१ किमी

एकूण अन्तर: ५६२ किमी                                   

Total Elevation Gain: >६७०० मीटर













  


2 comments: